पान:Ganitachya sopya wata.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा भाग वाचायला सुरू करण्यापूर्वी गुणोत्तर प्रमाण, सरळव्याज व पहिल्या भागातील व्यस्त प्रमाण हे चांगले समजावून घ्या, हवं तर त्यांची उजळणी करा. त्यानंतर हा अवघड भाग तेवढा कठीण वाटणार नाही.

मिश्र भागीदारी : कधी कधी दोन अगर जास्त लोक वेगवेगळ्या संख्यांचे भांडवल धंद्यात गुंतवतात व त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणात त्यांना फायदा अगर तोटा मिळतो हे आपण पाहिले. पण जेव्हा दोन माणसे वेगवेगळ्या मुदतीसाठी भांडवल देतात, तेव्हा त्या मुदतीचाही विचार फायदा वाटून घेताना करावा लागतो. अशा वेळी दिलेल्या माहितीचा उपयोग करून प्रत्येकाने एकाच महिन्यासाठी, किंवा एकाच वर्षासाठी किती भांडवल ठेवले आहे हे शोधावे. 200 रु. भांडवल 4 महिन्यासाठी गुंतवले तर ते 800 रु. भांडवल 1 महिन्यासाठी गुंतवल्याप्रमाणे होते. अशा प्रकारचे गणित कसे सोडवता येते ते पहा.

उदा. कमलाने 4000 रु. दोन वर्षांसाठी दुकानात गुंतवले तर लीलाने 6000 रु. 10 महिन्यांसाठी गुंतवले. दुकानाचा फायदा 2600 रु. असेल तर प्रत्येकीने किती फायदा वाटून घ्यावा?

इथे मुदत 2 वर्षे किंवा 24 महिने व 10 महिने अशी वेगवेगळी आहे. म्हणून प्रत्येकीने 1 महिन्यासाठी किती रक्कम गुंतवली ते काढू.

कमलाने 4000 रु. 24 महिन्यांसाठी म्हणजेच

24x4000 = 96,000 रु. एका महिन्यासाठी गुंतवले.

तर लीलाने 6000 रु. 10 महिन्यांसाठी म्हणजेच

6000x10 = 60,000 रु. एका महिन्यासाठी गुंतवले.

∴ आता दोघींना नफा 96000/60000 = 96/60 = 8/5

या प्रमाणात वाटायचा. कमलाचा नफा 8p व लीलाचा 5p मानला तर

8p + 5p = 13p = 2600

∴ p = 200

मिश्र भागीदारी, चक्रवाढ व्याज, व्यस्त प्रमाण इ.
७३