पान:Ganitachya sopya wata.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पालक वर्ग व शिक्षकांसाठी,

पाचवी, सहावी व सातवीची गणिताची पाठ्यपुस्तके एकंदरीने चांगलीच आहेत. पण या इयत्तांमधील अनेक विद्यार्थ्यांना कधी कधी विषय नीट समजत नाही, गणिते चुकतात व मग या विषयाची भीति वाटू लागते-तो अधिकाधिक नावडता होत जातो. अशा विद्यार्थ्यांना, पाठ्यपुस्तकाला पूरक म्हणून या पुस्तकाचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. पाठ्यपुस्तकांत काही ठिकाणी चांगली चित्रे घालून त्या त्या विभागाचे स्पष्टीकरण करणं अधिक चांगलं करता आलं असतं. या पुस्तकात समीकरण व अपूर्णांकांची तुलना या विषयांवर विद्यार्थ्यांना चटकन समजतील अशी चित्रं घातली आहेत. उत्साही शिक्षक याप्रमाणे अनेक चांगली चित्रं तयार करू शकतील. पाठ्यपुस्तकात वेगवेगळ्या भागात, गणिते सोडवताना वेगवेगळ्या प्रकारची मांडणी करण्यास शिकवले आहे, पण प्रत्येक विभागासाठी वेगळी मांडणी करायला शिकताना विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो व कुठलीच मांडणी ध्यानात रहात नाही. उलट समीकरणे हाताळण्याची सवय व गुणोत्तरप्रमाणाची चांगली समज असेल, तर अनेक प्रकारची गणिते (उदा० समप्रमाण, सरळव्याज, शेकडेवारी, नफातोटा-कमिशन इ०) एकाच रीतीने करता येतात. म्हणून या पुस्तकात ही एकच पद्धत पक्की करण्यावर भर दिलेला आहे. व्यस्त प्रमाणाची गणितेही, गुणोत्तर प्रमाणाचे उलटे प्रमाण करण्याऐवजी अनेकांवरून एक, एकावरून अनेक यांचा विचार करत, पायरी पायरीने सोडवता येतात. दिलेल्या गणितात कुठले गुणोत्तर समप्रमाणात वापरायचे, कुठले व्यस्त असल्याने उलटे करून वापरायचे याबद्दलही अनेक विद्यार्थी घोटाळा करतात.