पान:Ganitachya sopya wata.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सोडवतात ते पाहिले. आतां विरुद्ध प्रमाणात बदलणाऱ्या संख्यांची गणिते कशी सोडवावी ते पाहू. तुमच्या 6 वीच्या पुस्तकात अशा गणितांचे गुणोत्तर उलटे असते. याचा उपयोग करून अशी गणिते सोडवून दाखवली आहेत पण या पद्धतीने सोडवताना काही मुलांचा गोंधळ होतो व गुणोत्तर उलटे करून नक्की कधी लिहायचे व कधी तसेच ठेवायचे हे काहींना चटकन समजत नाही. त्यासाठी दुसरी साधी रीत वापरूनही ही गणिते करता येतात. कशी ते पहा -

उदा. एक माणूस एक भिंत बांधायला दहा दिवस घेतो. पाच माणसे मिळून किती दिवसात बांधतील ?

इथे एका माणसाऐवजी जास्त माणसे लावली तर दिवस कमी होतील म्हणून माणसे व कामाला लागणारा वेळ हे व्यस्त प्रमाणात आहेत - त्यापैकी एक कमी झाल्यास दुसरा वाढतो. तेव्हा हे गणित सम प्रमाणाचं नाही. एकाऐवजी पाच माणसं लावली तर ती एका माणसाचे पाच दिवसाचे काम एका दिवसात करतील आणि दोन दिवसात एका माणसाचे दहा दिवसाचे काम करतील होय ना ? म्हणून पाच माणसे तीच भिंत दोन दिवसात करतील.
या ठिकाणी रीत काय आहे पहा - एका माणसाला दिलेलं काम करायला किती दिवस लागतात ते पहा व जास्त माणसे असतील तर त्या माणसांच्या संख्येने दिवसांच्या संख्येला भागा म्हणजे लागणारे दिवस मिळतील.
इथे एका माणसाला दहा दिवस लागतात व एकूण 5 माणसे लावली तर 10/5 = 2 दिवसात काम होईल.

एका माणसाला लागणारा वेळ/एकूण माणसांची संख्या = एकूण माणसांना लागणारा वेळ

किंवा एका माणसाला लागणारा वेळ = जास्त माणसांची संख्या x तेवढ्या माणसांना लागणारा वेळ

व्यस्त प्रमाणाची गणिते (काळ काम वेग)
३९