पान:Ganitachya sopya wata.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  आता समप्रमाणावरची काही साधी गणित सोडवा. - त्यापूर्वी पुन्हा एकदा लक्षात ठेवा.

 गुणोत्तर प्रमाणाची गणितं करताना आपण कुठल्या दोन गोष्टीचं गुणोत्तर घेतो ते नीट पहा. म्हणजेच गुणोत्तराच्या अंशस्थानी कुठली व छेदस्थानी कुठली संख्या आहे ते पहा व त्यात गोंधळ करू नका. माहीत नसलेल्या संख्येसाठी अक्षर माना व गुणोत्तराचा अपूर्णांक पुन्हा, अक्षर वापरून लिहा. दोन्ही प्रकारांनी लिहिलेलं गुणोत्तर एकच आहे याचा उपयोग करून समीकरण लिहा व ते सोडवा. मग अक्षरांची किंमत किंवा जी संख्या शोधायची ती मिळेल.

 सरावासाठी गणिते -

(1) तीन किलो तांदळांना 12 रू. पडतात तर 8 किलो तांदळांना किती रूपये पडतील ?

(2) 2 लीटर पेट्रोलमध्ये गाडी 46 किलोमीटर जाते. तर 161 कि.मी. जाण्यासाठी किती पेट्रोल लागेल ?

(3) 35 रु. मधे 5 किलोग्राम साखर मिळते तर 18 कि. ग्राम साखरेला किती रुपये पडतील ?

(4) 100 रु. कर्ज काढल्यास दर वर्षी 18 रु. व्याज द्यावे लागते तर 150 रु. काढल्यास किती व्याज दर वर्षी द्यावे लागेल ?

शेकडेवारी

गुणोत्तर प्रमाणाचा उपयोग करून शेकडेवारीची गणितं कशी करतात ते पाहू. तुम्ही अपूर्णांकांची तुलना करताना पाहिलं कीं वेगवेगळे अपूर्णांक जर एकाच उंचीच्या ठोकळ्यावर उभे असतील, म्हणजे सर्व अपूर्णांकांच्या छेदस्थानी एकच संख्या असेल तर त्यांची तुलना सहज करता येते. अनेकदा अशा प्रकारची तुलना गणितात करताना 100

२४
गणिताच्या सोप्या वाटा