पान:Gangajal cropped.pdf/98

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १०५


रूपकं आहेत. तसंच हे एक. मदन म्हणजे एडकाच, व तो इतका मस्त की, तो वाघाप्रमाणे सामर्थ्यवान. सबंध रूपकच देते. नाही तर दुसऱ्या कोणा मनाला माझ्याप्रमाणे कोडं पडायचं.

 एडका मदन तो केवळ पंचानन।।ध्रु||  धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा।  इन्द्रचन्द्रासी भेदरा । लाविला ज्यानं  तो केवळ ।।ध्रु.॥  धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा  दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण ।  तो केवळ ॥ध्रु.॥  भस्मासुर मुकला प्राणांसी । तेचि गती झाली वालीसी  विश्वामित्रासारिखा ऋषी । नाडिला ज्यानं  तो केवळ ॥ध्रु.॥  शुकदेवानें ध्यान धरूनी । एडका आणिला आकळोनी  एका जनार्दनाचे चरणी । बांधिला जेणें।  तो केवळ पंचानन ॥

 मदनरूपी एडक्यानं सर्वांना लोळविलं. फक्त शुकानं त्याच्यावर मात केली म्हणून शेवटच्या ओळीतलं 'पंचानन' हे विशेषण एडक्याला लागू नसून शुकाचं समजण्यास हरकत नसावी. आता ह्या ओळीशी विठोबाचा संबंध काय, हा दुसरा प्रश्न. त्याचं उत्तर माझ्या हातातच होतं. 'सकलसतगाथे'त संतांची कविता होती,- मुख्यत: वैष्णव वारकरी संतांची कविता होती. ह्या कवींच्या तोड्न जे- जे बाहेर पडलं, ते- ते सर्व थेट विठोबाशी रुजू होतं, हा वारकऱ्यांचा दृढ विश्वास. शब्द काहीही असोत, 'हरि मुखे म्हणा' असोत. 'चंदनाची चोळी, माझे अंग अंग पोळी' असोत, 'विटंबिती रांडापोरें' असोत. 'नाम घेतां उठाउठी, होय संसाराची तुटी' असोत वा 'एडका मदन' असोत. सर्व काही सारख्या प्रमाणात विठोबाच्या चरणी रुजू होतं. दोन्ही प्रश्न एकदम सुटले.

 ह्या एडक्याच्या आधीही आईनं मला एका कोड्यात टाकिलं होतं. आम्ही त्या वेळी ब्रह्मदेशात होतो. वडील दर दोन वर्षांनी काहीतरी