पान:Gangajal cropped.pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०४ / गंगाजल


“एडका मदन-मदन-मदन, तो केवळ पंचानन, केवळ पंचानन! एडका मदन." मला सबंध भजन ऐकायचं होतं. पण आजीला घरी जायची घाई होती आणि मला तिच्या बरोबर जावंच लागलं. माझे कान मागे लागले होते; पुढची ओळ काय आहे, हे ऐकण्याची उत्सुकता होती; पण आम्ही लांब जाईपर्यंत, 'एडका मदन' व 'पंचानन' एवढीच अक्षरं ऐकू येत होती. एडका, रतिपती मदन आणि पंचानन ह्यांचा संबंध काय असावा, मला मोठ्ठं कोडं पडलं होतं. “पंचानन म्हणजे काय ग?" "वाघ.' एवढंच उत्तर भराभर चालणाऱ्या आजीनं दिलं होतं. त्यानं काही कळलं तर नाहीच, पण मन आणखी गोंधळात पडलं.

 ज्ञानदेवीचा अठरावा अध्याय मी काही आजच वाचीत नव्हते. धातूला 'अन' लागून होणारी असंख्य नामंही माझ्या चांगली माहितीची होती. पण आजच का कोण जाणे 'प्रभंजन' शब्द वाचला आणि पूर्वी ऐकिलेल्या त्या 'मदन' शब्दाचा अर्थ कळला असं वाटलं. ओळीचा अर्थ लावला. 'एडका' मदन' म्हणजे 'माजलेला एडका'; 'तो केवळ पंचानन' म्हणजे कळला, "नुसता वाघ आहे." तेवढ्यापुरतं जुनं कोडं उलगडल्यासारखं वाटल. पण मनाचं समाधान होत नव्हतं. 'मदन' म्हणजे 'माजविणारा, माजलेला' असा अर्थ करिता येईल. पण ह्या ठिकाणी बसतो का, असा नवा प्रश्न पड़ला आणि 'एडका मदन तो केवळ पंचानन' ह्या ओळीचा विठोबाशी संबंध काय? ह्या ओळी लिहिणारा तरी कोण? मला वाटलं, नक्की तुकारामबुवांच्या गाथेत ह्या ओळी सापडतील. सर्व गाथा धुंडाळली; पण व्यर्थ. डेक्कन कॉलेजातल्या एका प्रोफेसरांना विचारलं; “नक्की ठाऊक नाही, पण एकनाथांच्या असाव्यात."

 एकनाथ म्हणजे समुद्र. त्यात ह्या ओळी शोधायच्या कुठं? ज्या अर्थी एका लहान गावातली भजनी मंडळी त्या म्हणत होती, त्या अर्थी पांगारकरांच्या किंवा अशाच एखाद्या भजनी गाथेत सापडावी. 'सकलसंतगाथा' नावाच्या बारीक टाइपातला एक अवाढव्य ग्रंथ लायब्ररीत मिळाला. त्यात एकनाथ पाहिला. तो 'एडका' ह्या नावाखाली एक पाच- सहा ओळींचं रूपक सापडलं. आणि कळलं की, माझा अर्थ अगदीच चुकीचा होता. त्या ओळीत 'मदन' म्हणजे 'माज आणणारा मदन' म्हणजे 'रतिपती' अर्थात 'कामदेव' हाच अर्थ अपेक्षित आहे. कुत्रा, गाय, वगैरे