पान:Gangajal cropped.pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



तेरा :
उकल


 कधीतरी काहीतरी कोडे पडलेलं असतं. तेही इतक्या मागं की, आपल्याला एखादी गोष्ट कळली नाही ही गोष्टसुद्धा मन-जागृत मन- विसरलेलं असतं आणि एकदम एखादे दिवशी अगदी भलत्याच संदर्भात जुन्या आठवणी जाग्या होतात, मनाला डिवचतात व पुन्हा विचार करायला लावतात. जुनी कोडी उलगडतात, कधीकधी पूर्णपणे, कधीकधी नवी कोडी मनापुढे उभी करून.

 ज्ञानदेवीच्या अठराव्या अध्यायाची सुरुवात म्हणजे शब्दांची कसरत आहे. प्रत्येक शब्द समास आहे. त्या समासातील शब्दांचे अर्थ समजून सबंध समास कळायचा, म्हणजे मन एकाग्र करून वाचावं लागतं. माझ्या समजुतीपमाणे सर्व चित्त देऊन मी वाचीत होते. पण माझ्या मनाचा काही भाग मला नकळत भटक्या मारीत असला पाहिजे. डोळे वाचीत होते. जन्मजराजलदजालप्रभंजन' मन एकदम म्हणालं, “मदन-एडका मदन." मदन हा शब्द 'प्रभंजन' सारखाच आहे. प्रभंजन-भंग करणारा; तसेच, ‘मदन' म्हणजे मद आणणारा, मदास असणारा, म्हणजेच मद आलेला. 'एडका मदन" म्हणजे 'मद आलेला एडका' अठरावा अध्याय राहिला बाजूला आणि जणू आता घडत आहे अशा प्रकारे पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या. आजीच्या बरोबर मी रत्नागिरीच्या विठोबा-मंदिरात होते. सभामंडपात भजन रंगात आलं होतं. सोनार मंडळींची दिंडी होती म्हणे. एकजण गळ्यात पखवाज अडकवून वाजवीत होता. इतरांच्या गळ्यात झांजा होत्या. सर्वजण अगदी रंगात येऊन भजन म्हणत होते व नाचत होते -