पान:Gangajal cropped.pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १०१


नाही. परतपरत वाटतं, असा प्रसंग परत आला, तर मी काय करावं?

 माझ्या मते मी लेख संपविला, पण माझा खट्याळ सांगाती मला स्वस्थ बसू देईना. त्याचे कधी न मिटणारे डोळे माझ्याकडे लागले होते. तो बोलत नाही, पण तो असा पाहू लागला की, माझं विचारचक्र परत सुरू होतं. कोणीतरी विचारीत आहेसं वाटतं.

 “तुला असं वाटतं का की, तू स्वस्थ बसली असतीस, तर स्वत:ला दोष दिला नसतास?"

 माझे मीच उत्तर दिलं, "छे! मी गप्प बसले असते, तर उगाच गप्प बसले, डॉक्टर शोधून आणला असता तर मूल मेलं नसतं, असं वाटून हळहळत बसले असते.”

 "हं!"

 माझं मीच उद्वेगानं विचारलं, "म्हणजे मनुष्याच्या हातून योग्य कृती होण्याची कधीच शक्यता नाही का?"

 “माहीत असन वेडे प्रश्न का उभे करतेस?"

 "मूल किंकाळ्या मारतं आहे, त्याचे हातपाय आखडत आहेत. तोंड वेडंवकडं होत आहे, ते खूपखूप आजारी आहे, एवढंच मला समजलं होतं. ते पोरगं वाचणं शक्य नाही. हे मला माहीत नव्हतं. मला नाही, पण डॉक्टरला समजेल. तो काही तात्पुरता उपाय करू शकेल असं मला वाटलं, म्हणून मी गेले-"

 "बरं मग?"

 "मी गेले नसते व मूल मेलं असतं, तर मला शक्य असून मी मदत मिळवायची धडपड केली नाही, म्हणून जन्मभर मनाला बोचणी राहिली असती."

 "हं!"

 माझ्या लुडबुडीनं त्या बाईला काडीचीही मदत झाली नाही, उलट त्रास मात्र झाला, हे मागाहून झालेलं ज्ञान!"

मी पुढे म्हटलं. "तो काम्यूचा नायक 'मदतीला गेलो नाही,' म्हणून हळहळत होता, व मी गेले म्हणून हळहळते आहे!"

 परत आपलं नुसतं "हं!"

परत विचार करून मी म्हटलं, "हा जो प्रकार झाला, ते ह्या अपूर्ण जीवदशेतील मनुष्यव्यवहाराचं सर्वसाधारण वर्णन, असं म्हणता येईल."