पान:Gangajal cropped.pdf/91

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९८ | गंगाजल


एकाकी जीवन तो जगत होता. तरीही ती किंकाळी सदैव त्याच्या सोबतीला होती. पुस्तकाच्या शेवटी नायक म्हणतो 'एकदा तो क्षण परत माझ्या आयुष्यात यावा. त्याला असं वाटतं की, 'मी योग्य त-हेनं वागेन' पण लगेच दुसऱ्या क्षणाला तो म्हणतो, “काय उपयोग? तो क्षण परत आला, तर मी तसंच वागणार नाही कशावरून?"

 ती चित्रात पाहिलेली किंकाळी आणि ही वाचलेली किंकाळी सारखी अधूनमधून आठवते.

 तिसरी किंकाळी ही माझ्या आयुष्यात घडलेली एक घटना. ती काही एकच किंकाळी नव्हती. एकामागून एक दिलेल्या बऱ्याच किंकाळ्या होत्या. पण त्या सर्व आज माझ्या कानांत आणि जाणिवेत एकाच किंकाळीसारख्या आहेत. ह्या स्वत: ऐकिलेल्या किंकाळ्या आजही मनात घोळतात.

 मी पुण्याहून मुंबईला चालले होते. बायकांच्या थर्ड क्लासच्या डब्यात मला खिडकीशेजारी जागा मिळाली. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी बाकावर बसल्या बसल्या, डब्यात इतर कोण आहे ते बघत होते. गाडी भांबुरड्याला (म्हणजे हल्लीचं शिवाजीनगर) थांबली. एक तरुण बाई मुलाला खांद्यावर टाकून डब्यात शिरली व माझ्याविरुद्ध बाजूला प्लॅटफॉर्मशेजारी खिडकीशीच बसली. बाईच्या अंगावर कोरं-करकरीत लुगडं होतं. मुलाच्या अंगावरचे कपडेही, टोपडं, झबलं वगैरे नवे, कोरे-करकरीत होते. बाईला पोहोचवायला मध्यम वयाची दोन माणसं आली होती,-एक बाई व एक पुरुष. त्या सर्वांना पाहताना माझ्या मनात आलं, पहिलटकरीण बाळाला घेऊन सासरी निघालेली दिसते आहे. पोहोचवायला आलेले आईबाप दिसताहेत. अशा प्रसंगी नेहमी कितीतरी बोलणी होतात. पण ह्या वेळी मात्र कोणी कुणाशी बोलत नव्हतं. बाळ घेतलेली पोर गप्पच होती. बाहेरचं वयस्क जोडपंही बोलत नव्हतं. गाडी सुटली. त्यांनी मानेनंच मुलीचा निरोप घेतलां मुलीनं बाकावर मांडी घातली आणि मुलाला मांडीवर ठेविलं. हा सर्व वेळ मूल झोपेतच होतं, असं दिसलं.

 गाडी चालू झाली. मी खिडकीबाहेर बघू लागले. डब्यात फारशी गर्दी नव्हतीच. त्यामुळं फारसं बोलणं-चालणंही नव्हतं. सगळं जरा शांतच होतं. असा अर्धा-एक तास गेला असेल. मलाही किंचित डुलकी लागली होती. एवढ्यात एकदम एका किंकाळीनं मी खडबडून जागी झाले. पाठोपाठ दुसरी किंकाळी ऐकू आली. चाललंय काय, म्हणून मी इकडेतिकडे पाहिलं.