पान:Gangajal cropped.pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ९३


नेली होती. त्यांना रात्री-अपरात्री वाट दिसावी म्हणून ब्रिटनीमधली कोणीही बाई आपल्या खिडकीत पणती ठेवून बसली नव्हती. घरावर रुसून गेलेल्या मुलासारखीही ही नव्हती. ती बाहेर निघाली होती हे खरे; पण परत जायला त्यांना घरच उरले नव्हते. जेथे व्यक्तिमत्त्व, स्वत्व नाहीसे झाले आहे, अशा खऱ्या प्रयाणाला ती निघाली होती...

 "त्यांना कोणतीही मानवी घनता नव्हती. ज्यांना अमुक-एक घर आहे. अमुक-एक मित्र आहे, अमुक-एक जबाबदारी आहे, अशी ती माणसे नव्हती. हे सर्व आपल्याला आहे, असे ती वागत होती. पण तो निव्वळ एक खेळ होता. कोणाला त्यांची गरज नव्हती. कोणीही त्यांच्याकडे मदत मागायला जाणार नव्हते."

 म्हातारी माणसे अशाच महाप्रयाणाला निघालेली असतात. येथले सर्व काही-आपले घर, आपली आळी, आपली माणसे, ज्याने म्हणून मानवी जीवनाला घनता आलेली असते, जे-जे म्हणून येथल्या मातीत दृढमूल झालेले असते, ते सर्व टाकून त्यांना जायचे असते. परत यायचे नसते. जेथे जायचे, तेथे येथल्या ओळखीदेखी उपयोगी नसतात. येथल्या कोणालासुद्धा त्यांची गरज नसते, आणि अगदी अशाच वेळी त्यांना स्वत:बद्दल, स्वत:च्या अनुभवांबद्दल, स्वत:च्या मित्रांबद्दल बोलावेसे वाटते.

 एझुपेरीचे पुस्तक न वाचलेल्या माझ्या एका बालमैत्रिणीने अगदी अशाच तर्‍हेचे शब्द परवा उच्चारिले. प्रश्न होता कोल्हापूर सोडण्याचा,-पुण्याला येऊन राहण्याचा. "लग्नानंतरचे सर्व आयुष्य येथे गेले. येथे रस्त्यातून गेले, तर पंचवीस माणसे ओळखीची भेटतात. कुणी मदत मागायला येतात, कुणी सल्ला विचारायला येतात. कुणाला गरज आहे, ते आपल्याला माहीत असते. दोन दिवस आम्ही दिसलो नाही, तर लोक घरी विचारपूस करायला येतात. पुण्याला सुट्टीत गेले होते. सबंध आठवड्यात कोणी ओळखीचे भेटले नाही. भाऊ व नातेवाइक आपापल्या कामांत वा मेळाव्यात दंग. आपली कोणाला गरजच नाही. मला इतके चमत्कारिक वाटले. मी आले बाई निघून परत." लहानपणची तिची पुण्यातल्या मातीतली मुळे तुटली होती. म्हातारपणी नवी मुळे येण्याची तिला तरी शक्यता वाटत नव्हती.

 व्यक्तिमत्त्व, वैशिष्ट्य, मीपणा हे सर्व माझे स्वत:चे खाजगी असे काहीतरी आहे, असा माझा समज होता. फक्त मलाच हे तीन गुण आहेत, इतरांना नाहीत, हा माझा ग्रह कधीच नव्हता. उलट प्रत्येक व्यक्तीला ते आहेत.