पान:Gangajal cropped.pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अकरा :


लोक आत्मचरित्र का लिहितात?


 आपल्या स्वत:बद्दल लिहावेसे वाटणे हे म्हातारपणाचे लक्षण आहे. मला वाटते, मी पाहिलेली आत्मचरित्रे, आठवणी सर्व म्हाताऱ्यांनीच लिहिलेली आहेत. तरुण माणसांनीही क्वचित स्वत:बद्दल लिहिले आहे, पण ते स्वत:चे एखादे कृत्य वा भूमिका ह्यांच्या समर्थनासाठी आहे. “मी माझा धर्म का सोडला?' “मला कम्युनिझमचा वा भांडवलशाहीचा कंटाळा का आला?"- अशासारखी ती आत्मनिवेदने आहेत. स्वत:च्या आयुष्यावरच आधारलेल्या एखाद्या प्रसंगाचे चित्रण, नाटक, कादंबरी, कथा वा काव्य ह्या रूपानेही ती आपल्यापुढे आलेली आहेत. पण त्यांतही चितारलेल्या स्वानुभवातील 'मी' नाहीसा होऊन त्या 'मी' चे एक सर्वात्मक प्रतीक बनते. अशा त-हेच्या वाङमयातील आनंद, दुःख, त्वेष ही अमक्या-एका कालातील, अमक्या-एका ठिकाणी असलेल्या अमक्या-एका व्यक्तीची न राहता तशा त-हेच्या प्रसंगातील कोणाचीही बनतात. असे झाले असते, तर आपल्यालाही असेच वाटले असते, अशी भावना तशा प्रसंगातून न गेलेल्या व्यक्तींनासुद्धा निर्माण होते. थोड्याफार फरकाने सर्वच वाङमयाबद्दल असे म्हणता येईल. पण आत्मकथा व्यक्तिगत राहते; ज्या गोष्टी आपण आपल्या मित्रांजवळ बोलू, त्या सर्वांजवळ बोलल्या जातात. हे म्हातारपणाचेच लक्षण नाही का?

 माझे एक मित्र काही दिवस 'आत्मचरित्र' म्हणजे काय व लोक ते का लिहितात, ह्याबद्दल सारखी चर्चा करीत होते. त्यांनीही आत्मचरित्र लिहिले होते. ते का, हे त्यांनी सांगितले नाही. मीही विचारिले नाही. पण त्यांचे आत्मनिवेदन काही थोडे प्रसंग वगळल्यास प्रसंगनिष्ठ व वस्तुनिष्ठ झालेले