पान:Gangajal cropped.pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ८९


 गम्मतच आहे. एकटे, सर्वात्मक, दुसरे नाही, असे असले म्हणजे इतर असावेत, असे वाटते; ब्रह्म झाले म्हणून काय झाले, त्यालाही कुणाचे तरी बोलणे ऐकावेसे वाटले, कुणालातरी पहावेसे वाटले; म्हणून ते पुष्कळ झाले; आणि त्याचे तुकडे एकमेकांची खरी भेट होत नाही म्हणून रडतातच. एक असतानाच एकाकीपणा घालविण्यासाठी दुकटे व्हायचे, आणि पुष्कळ असल्यामुळे वाटणारा एकाकीपणा घालविण्यासाठी विश्वात्म्याकडे धाव घ्यायची. हे चक्र कधीच थांबणार नाही. माझ्या अगदी आतल्या मनाचेही समाधान झाले वाटते. तेसुद्धा कुरतडायचे थांबून दमलेल्या कुत्र्यासारखे पुढच्या पंजात डोके टेकून शांत निजले.

१९६२