पान:Gangajal cropped.pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



एक :
बॉय-फ्रेण्ड?


 मी पंढरपुराहून येऊन विश्रांती घेत कोचावर पडले होते. शेजारीच एका खुर्चीवर लेक काही तरी वाचीत बसली होती, आणि तिचा नवरा ओसरीवरून खोलीत व खोलीतून ओसरीवर अशा येरझरा घालीत होता. निरनिराळ्या कामांची निरनिराळी माणसे त्याला भेटायला येत होती. माणसे आली की तो बाहेर जाई, माणसे गेली की घरात तो माझ्याशी बोले. असे आमचे संभाषण चालले होते.

 तो आला. माझ्यासमोर खुर्ची घेऊन बसला आणि त्याने मला विचारले, “काय, भेटला का बॉय-फ्रेण्ड?"

 प्रश्न ऐकून काही क्षण मी बुचकळ्यातच पडले. मग लक्षात आले की, हा मुलगा विठोबाबद्दल विचारीत आहे. मी हसून म्हटले, “हो, भेटला की"

 एवढ्यात बाहेर माणसे आली. तो निघून गेला.

 पण त्याच्या प्रश्नाने माझी झोप मात्र उडाली. एका दृष्टीने बॉय-फ्रेण्ड हे बिरुद नवेच होते, पण अर्थाने काही नवे नव्हते. आई, बाप, सखा, सोयरा, जिवलग अशा कितीतरी नावांनी लोकांनी विठोबाला आळविले आहे. जिवलग वगैरे नावांत जो अर्थ, तोच अर्थ बॉय-फ्रेण्डमध्ये नाही का? प्रियकर म्हणून कितीतरी भक्तांनी देवाला आळविले नाही का?

 स्वारी परत घरात आली. दर प्रश्नानंतर बाहेर गेल्यानंतर निरनिराळ्या विषयांवर बोलून परत जुन्या प्रश्नाचा धागा त्याच्या मनात कसा राही, कोण जाणे! त्याने म्हटले, “तुझ्या नवऱ्याला बरा चालतो ग, बॉय-फ्रेण्ड असलेला?" मी म्हटले, “असले बॉय-फ्रेण्ड चालतात नव-यांना." माझे