पान:Gangajal cropped.pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



दहा :


एकाकी


 मी एकटी आहे. मी काय एकाकी आहे होय? मुळीच नाही. माझ्याभोवती माझी काळजी घेणार्‍यांची गजबज आहे. मग मी काय असहाय आहे ? अंहं. मी हाक मारण्यापूर्वीच कितीतरी हात मला मदत द्यायला तयार आहेत, कितीतरी पाय माझ्यासाठी धावताहेत. इतकी माणसे भोवती पण कुणाला म्हणून माझ्या अंत:करणाचा ठाव सापडला नाही, असा का प्रकार आहे? छे! तसेही नाही. माझ्या अंत:करणाचा ठाव ज्यांना सापडला, अशीही पुष्कळ आहेत. मग मी एकटी कशी?

 मी एकटीच होते, -आहे, व पुढेही एकटीच असणार आहे. हे उमजायला जवळजवळ सगळे आयुष्य जावे लागले! सगळ्या गोष्टींचे हे असेच आहे. सर्व आपल्या डोळ्यांपुढे असते, पुस्तकातून वाचीत असतो, समजले आहे असा भास होत असतो. एक दिवस, -कसे कोण जाणे? - अंतरी एकदम वीज चमकावी असा प्रकाश पडतो व खरोखरचे समजते. मी माझ्या स्कूटरवर बसून स्वतंत्रपणे ती चालवू लागले तेव्हाची गोष्ट. पहिल्याच दिवशी माझ्यापुढे एक टांगा होता. टांग्याचा वेग किती, मोटारीचा वेग किती, या गोष्टी मला अगदी तोंडपाठ होत्या. मला टांग्याच्या पुढून एक वळण घ्यावयाचे होते. मी आपली वाट पाहत होते, टांगा पुढे सटकेल आणि आणि मी वळेन म्हणून. एकदम माझ्या डोक्यात लख्ख झाले. अरे, मी तर टांग्यापेक्षा कितीतरी जास्त वेगाने जाऊ शकते की!

 एखादे वेळी डोक्यात प्रकाश पटदिशी पडतो. कधीकधी फार-फार वेळ लागतो. मोठ्या श्रमाने मी कितीतरी गोष्टी एकत्र केल्या होत्या. द्राविड