पान:Gangajal cropped.pdf/74

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल /७९

 वर्षापुढे खूप जगतात. आणि धिरा देऊन उभ्या केलेल्या खांबाप्रमाणे नुसती उभीच राहतात असे नव्हे, तर आपापल्या अधिकारांच्या जागांना धरून, अगदी घट्ट धरून उभी राहतात. काही लोकांना अमक्या-एका वयाला जागा सोडून द्यावी लागते. कारकून, शिक्षक, सैन्यातले अधिकारी यांना आज- ना- उद्या जागा सोडाव्या लागतात. पण त्यांच्याहून वरचे अधिकारी गव्हर्नर, मिनिस्टर, निरनिराळ्या संस्थांचे मुख्य हे मात्र आपली जागा सोडीत नाहीत. एकतर ते त्या जागेवर असताना मरतात, किंवा त्यांना एका जागेवरून काढले, तर दुसरी मोठी जागा द्यावी लागते. पूर्वी पाच वर्षांची मुले पंचवीस वर्षांची होईपर्यंत सुदैवाने जुनी व्हावयाला तयारच नव्हती. ती मोठी माणसे होती. जबाबदारीच्या जागा संभाळून होती. आणि वडील पिढी लवकर मरून गेल्यामुळे स्वत:ची लहान भावंडे व मुले आणि आपण स्वत: या सर्वांच्या भरणपोषणाचा भार त्यांच्यावर पडलेला असे. इतक्या समजुतीने व इतक्या लवकर आईबाप मेले, म्हणजे मोठ्या श्रद्धेने त्यांचे श्राद्ध होत असे, आठवणी निघत असत. काही वेळेला तर मेलेल्या मनुष्याचा टाक करून देवात ठेवून त्याची पूजा होई. कवींना आईबापांवर काव्ये करावीशी वाटत. आमचे आईबाप होते, तेव्हा आम्हाला कसलीही काळजी नव्हती. ‘ते हि नो दिवसा गताः!' म्हणून रडायला वाव होता.

  पण आता पाच वर्षांची पोरे पंचवीस वर्षांची झाली, तर चाळीस वर्षाची माणसे साठ वर्षांची होऊन जगतच असतात आणि जगता-जगता खालच्या पिढीला बाप्ये होऊ न देण्याची खबरदारी घेतात. शाळा काढतात, कॉलेजे काढतात, तीस-तीस वर्षांचे झाले तरी त्यांना शिकवीत असतात. त्यांना पैसे देतात, कपडे देतात; फक्त एकच गोष्ट करीत नाहीत. त्यांना मोठे होऊ देत नाहीत. आपण मरतही नाहीत व बाजूलाही सरत नाहीत. अशा वेळेला बिचार्‍या खालच्या पिढीने जर बंड उभारले, तर नवल काय?

 ज्या शास्त्रीय प्रगतीने ही स्थिती आणिली, त्याच शास्त्राला त्यावर तोड नाही का सापडणार? काहींना जन्मालाच घातले नाही, व काहींना पन्नास वर्षांपर्यंत नाहीसे केले, तर ही सामाजिक समस्या सुटणार नाही का? ह्या दोहोंपैकी पहिला मार्ग पुष्कळ राष्ट्रांनी चोखाळलेला आहे. पण दुसरा मार्ग स्वीकारावयाचा, हे मात्र कोणाच्याही मनात येत नाही. ह्याउलट आयुष्याची मर्यादा वाढवावयाची कशी ? मरावयाला घातलेल्या माणसाला अर्धवट जिवंत अवस्थेत किती दिवस टिकविता येईल, ह्याकडे