पान:Gangajal cropped.pdf/73

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७८ / गंगाजल

  विभागाची मुख्य म्हणून मी राहिले. वेळच्या-वेळीच शहाणपणाने बाजूला सरून नव्या पिढीला वाव द्यावा, ते हातून झाले नाही. आणि काही सुदैवी सहका-यांप्रमाणे वेळीच मरणही आले नाही. त्यामुळे मूर्ख म्हाता-यांची जी स्थिती व्हावयाची, तीच माझी झाली. भांडण तत्वाचे नसून सबंध पिढीचे होते. कुठच्याही नीतितत्वापेक्षा अगदी खोलवर गेलेल्या जीवसृष्टीतील एका प्रवृत्तीचा तो आविष्कार होता, हे आता माझ्या ध्यानात आले.

 हे पिढ्यांचे भांडण, एका पिढीने दुसरीचा नाश करावयाचा ही प्रवृत्ती सनातन आहे, सर्व जीवनसृष्टीत आहे. एकेका कुटुंबात आहे; सर्व समाजात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आढळणारे तरुणांचे मोर्चे तिचेच निदर्शक नाहीत का? पूर्वीच्या इतिहासात धाकट्या पिढीने थोरल्या पिढीवर इतक्या व्यापक प्रमाणावर व इतक्या तीव्रतेने हल्ले केलेले दिसत नाहीत. अशा त-हेचा हल्ला ही जर एक सनातन प्रवृत्ती आहे, तर तिचा आविष्कार हल्लीच एवढ्या तीव्रतेने का व्हावा? पूर्वीची थोरली पिढी मुलांना चांगले जरबेत ठेवीत असे, तेव्हा बंड व्हावयाची शक्यता खरे म्हणजे जास्त असली पाहिजे. हल्लीची थोरली पिढी त्या मानाने तरुणांना दबून असते; तरुणांचे कौतुक करिते. तरीसुद्धा तरुणांनी इतके चेवून उठावयाला कारण काय?

 -याला कारणे दोन आहेत. पहिले कारण माणसाच्या शास्त्रीय प्रगतीत आहे; दुसरे कारण म्हातारी पिढी तरुण पिढीचे जे वरवरचे लाड करते, त्यात आहे.

 शास्त्रीय प्रगती ती अशी... गेल्या शंभर वर्षांत शास्त्राच्या सहाय्याने मरण टळले नाही तरी लांबले मात्र खास आहे. पूर्वी मूल जन्माला येऊन मोठे होणे म्हणजे एक दिव्यच होते. कित्येक मुले जन्मत:च मरत व निम्म्या- शिम्म्यांना पाच वर्षांच्या आतच मरण येई. आता सर्व जगभर व आपल्या भारतातसुद्धा बालमृत्यूचे प्रमाण खूप घटले आहे. पूर्वी पाचांवरून पंचवीसपर्यंत जाणारी मुलेच कमी होती. आता त्यांची संख्या दुपटी-तिपटीने वाढली. ह्याचप्रमाणे दुस-या टोकाला माणसे बहुतेक पन्नास वर्षाच्या आतबाहेर मरत असत. साधारणपणे चाळीस-पन्नास वर्षे जगणारी माणसे अगदी सर्वस्वी निरोगी क्वचित असत. पण आता यकृत बिघडले, हृदय मंदावले की, त्यावर तोंडाने घ्यावयाची ओषधे आहेत; अंगात टोचायच्या सुया आहेत. ऐकू आले नाही, तर कानाला चिकटवावयाला यंत्रे आहेत; धड दिसत नाही, तर चष्मा आहे. असे निरनिराळे टेकू देऊन माणसे पंचेचाळीस