पान:Gangajal cropped.pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल


तरुण पिढी वडिलांच्या विरुद्ध उठते. बंड करिते, क्वचित वडिलांना मारितेसुद्धा.

 अंध दीर्घतमा फारफार दिवस जगला. इतका की, मुले त्याला कंटाळली व शेवटी त्याला एका लाकडी तराफ्यावर बसवून मुलानी गंगेत सोडले. बिंबिसार व त्याची राणी इतकी जगली की, अजातशत्रूला त्यांना तुरुंगात टाकून राज्य घ्यावे लागले. तीच गोष्ट औरंगजेबानेही केली. बापलेकांच्या भांडणामध्ये लेकाने बापाला किंवा बापाने लेकाला मारल्याचे कितीतरी गुन्हे होत असतात. एक पिढी जावयाची, दुसरी पिढी यावयाची, आणि एका पिढीचे अधिकार दुसरीला मिळायचे, हा जो क्रम चाललेला असतो, तो होता-होईतो ताणाताणीशिवाय व्हावा, हे कुटुंबसंस्थेचे एक उद्दिष्ट. आणि त्याचमुळे बापाची जागा मोक्याची आणि धोक्याचीही. जी गोष्ट कुटुंबातील परिस्थितीची, तीच सर्व समाजाची. तेथेही अतिशय विस्तृत प्रमाणावर एका पिढीकडून अधिकार दुसऱ्या पिढीकडे जात असतो. आणि म्हणूनच दोन पिढ्या कायमच्या ताणलेल्या, दुरावलेल्या परिस्थितीत असतात.

 माझे विचार येथपर्यंत आले आणि एकदम अंधारात मोठा उजेड पडावा, तसे मला झाले. कुठच्याही प्रसंगात माझे विचार ठाम, जलद व परिस्थितीची समज असलेले असे नसतात. थोड्या गोंधळलेल्या मन:स्थितीतच, पण काही श्रद्धांना धरून मी काहीतरी करीत राहते, आणि मग कितीतरी दिवसांनी काहीतरी निराळ्याच संदर्भात पूर्वी घडलेल्या प्रसंगावर एकदम प्रकाश पडतो, मन एकदम लख्ख होऊन जाते. अगदी तसेच आता झाले. एकदा एक प्रसंग असा आला की. त्यामध्ये एका बाजूला मी व एका बाजूला माझे सगळे-सगळे तरुण सहकारी. अशी वेळ आली. त्या वेळी माझे मन भांबावून गेले होते. मी विचार करिताना प्रत्येक सहकाऱ्याबद्दल निरनिराळे विचार होते. अमका विरुद्ध वागला, त्याला हे अमके कारण झाले असावे; पण तो दुसरा आणि तिसरा ह्यांना का बरे माझी भूमिका कळू नेये? न्याय-अन्याय, सत्य-असत्य, अपराध आणि शिक्षा ह्यांबद्दलच्या माझ्या आणि त्यांच्या भूमिकेत एवढा मोठा फरक का बरे पडावा? मी अगदी हतबुद्ध झाले होते. पण आत्ता, ह्या क्षणी मला उमगले की, न्याय-अन्याय, अपराध-निरपराध वगैरे सर्व गोष्टी ह्या भांडणात अवांतर व गैरलागू होत्या. खरे भांडण होते दोन पिढ्यांचे. एक नाही, दोन नाही, २५-३० वर्षे एका