पान:Gangajal cropped.pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
नऊ :
'जुन्याच समस्या; नवे उपाय'

विद्यार्थी उठून गेला होता. पण ज्या विषयावर आम्ही बोलत होतो, तो माझ्या मनात अजून घोळत होता. कुटुंबसंस्थेतील मोक्याच्या जागा कोणत्या, धोक्याच्या जागा कोणत्या, आणि हा मोका आणि धोका कशामुळे उत्पन्न झाला असावा, हे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करीत होते. मोक्याची जागा घरातल्या कर्त्या पुरुषाची, म्हणजे बापाची, धोक्याची जागा हीही कर्त्या पुरुषाचीच, म्हणजे बापाचीच. हे का?

 कुटुंब हा दोन किंवा तीन पिढ्यांचा एकत्र राबता असतो. एक पिढी मोठी होत असते, मोठी झालेली दुसरी पिढी कुटुंब चालवीत असते. कुटुंबाला खाऊ-पिऊ घालते, कुटुंबासाठी श्रम करिते आणि त्याच्या मोबदल्यात कुटुंबावर अधिकार गाजविते. धाकट्या पिढीने मोठ्यांचे ऐकावे, मोठे सांगतील तसे वागावे, अशी अपेक्षा असते. सर्वसाधारणपणे थोड्याबहुत प्रमाणात ही अपेक्षा पुरीही होते. पण कधीकधी असे काही प्रसंग उदभवतात की, त्यांमुळे बाप-मुलगा, सासू-सून ह्याचे संबंध धोक्याचे आहेत, हे समजते. मुलगा बापाचा वारस असतो. बापाचे सर्व अधिकार, घरदार, साठविलेली माया त्याला मिळावयाची असते. सून आज-ना-उद्या आपण घराची मालकीण होऊ, अशी वाट पाहत असते. आयुष्याची काही वर्षे आज्ञाधारकपणे रहायला या दोघांचीहा मोठी तक्रार नसते. पण जर वडील माणसे मरणामुळे किंवा अपंग झालो जाणिवेमुळे लवकर दूर झाली नाहीत, तर तरुण पिढीचा आज्ञाधारकपणा, प्रेम व भक्ती यांना ताण बसतो, वाट पाहण्याचा तिला कंटाळा येतो आणि अशा वेळी