पान:Gangajal cropped.pdf/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 ७२ / गंगाजल

निघाली. तेव्हा आपला मुलगा जो स्कंद त्याला शत्रूच्या बाणाने जणू जखम केली, इतके दु:ख पार्वतीमाईंना झाले.

 'तेव्हा वन्यपशूपासून ह्या झाडाचे संरक्षण करण्यासाठी शंकराने माझी योजना केली. त्याने मला सिंहाचे रूप दिले व येणा-या-जाणा-या पशूंवर उपजीविका करण्यास सांगितले.'

 'ह्या कामात मला कधीचा उपास पडला आहे; भूक लागली आहे. बरी ही गाय आली आहे. आता हिच्या मांसाने पारणे करून मी आपला उपवास फेडणार आहे.'

 'तेव्हा तू आता परत जा. मनात खंत करू नकोस. तू गुरूची पुरेशी भक्ती केली आहेस. ज्याचे शस्त्राने रक्षण करणे अशक्य आहे, त्याचे रक्षण केले नाही, म्हणून क्षत्रियाला कमीपणा येण्याचे कारण नाही.'

 सिंहाचे बोलणे ऐकून राजा म्हणाला,

 'माझी हालचाल खुटली आहे. तेव्हा मी काय बोलतो, त्याचे तुला हसू येईल. पण तुला माझ्या अंत:करणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे. मी जे बोलतो, ते मनापासून हे तुला उमगेलच.'

 'जगाच्या उत्पत्ति-स्थिति-लयाला कारणीभूत अशा ईश्वराने तुला नियम घातला आहे; तो मी मान्य केलाच पाहिजे. पण आहिताग्नी गुरूचे माझ्या ताब्यात दिलेले धन डोळ्यांदेखत नष्ट झालेले पाहणेही मला अशक्य आहे.'

 'तेव्हा मला खाऊन तू आपली भूक भागव. आणि संध्याकाळच्या वेळी वासराकडे ओढ घेणार्‍या ह्या गायीला सोडून दे.'

 हे बोलणे ऐकून, हसत-हसत किंचित औपरोधिक स्वराने सिह म्हणाला,

 'तू जगाचा एकमेव राजा आहेस; तरुण आहेस; रूपाने देखणा आहेस. अशा थोडक्यासाठी पुष्कळाची हानी करणारा तू मला विचारशून्य मूर्खच दिसतोस.'

 'जीवदयेमुळे ह्या एका गायीचे काय- ते कल्याण होईल, पण तू जिवंत असलास, तर समस्त प्रजाजनांना बापाप्रमाणे निरनिराळ्या संकटांपासून वाचविशील.'

 'एकुलती-एक गाय असलेल्या आगजाळ कोपिष्ट गुरूच्या रागाची तुला जर भीती वाटत असेल, तर दुसऱ्या कोट्यवधी दुभत्या गायी देऊन त्याचा राग तू शमवू शकतोस.'