पान:Gangajal cropped.pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ६६ / गंगाजल

स्पष्ट असतात. काही अवस्थांमध्ये त्या बऱ्याच अस्पष्ट होतात. एका समाजाचा परकीय समाजाशी कोणत्याही तऱ्हेनेनिकट संबंध आला, म्हणजे आचारविचारभिन्नतेची तीव्र जाणीव होऊन ह्या मर्यादा पुसट व्हायला लागतात. उदाहरणेच द्यावयाची, तर आपल्या स्वत:च्या समाजातील देता येतील. “जाईन उभ्या बिदी। न दिसे उजवी बूज। राखील कुळ तुझं!" ह्या ओवीत मर्यादशील स्त्रीने पदर कसा घ्यावा, हे सूचित केले आहे. आजकाल कित्येक कुलवानांच्या मुली व वधू ह्यांचा पदर मुळी एकाच खांद्यावर असतो. तेव्हा ही मर्यादा बदलण्याचे कारण ज्या समाजात स्त्रिया दोन्ही खांदे उघडे टाकितात अशा समाजाशी संबंध आला, हेच आहे. पूर्वीच्या काळी लग्नाच्या दोन बायका असणे हे अप्रतिष्ठेचे लक्षण नव्हते. आता ती गोष्ट गुन्ह्याच्या सदरात जाऊन बसली आहे. हाही परिणाम संस्कृतिसंगमाचाचआहे.

 प्रत्येक समाजामध्ये आचाराचे जे नियम असतात, ते सर्वच्या-सर्वच अगदी निरपवाद नसतात. काही प्रसंगी ते नियम सैल होतात, किंवा काही वेळेपुरते अजिबात नाहीतसे होतात. उदा.- होळीच्या दिवसांत गोवरी-लाकडाची चोरी करणे पूर्वी क्षम्य मानिले जाई. तसेच, एरव्ही सभ्य वागणारे लोक त्या दिवसांत मन मानेल तसा गलिच्छपणा व शिवीगाळही करीत असत. काही प्रसंगी एरव्ही कानाला न रुचणारा विनोद आणि थट्टा क्षम्य समजली जाई. बहुतेक सर्व समाजांतून सर्वसाधारणपणे न खपणारे वर्तन काही विशिष्ट प्रसंगी करण्याची मुभा असे, आणि ही मुभाही सर्वांना नसून काही विशिष्ट वयाच्या व तऱ्हेच्या व्यक्तींना असे. हिंदू समाजातील शिमगा किंवा ख्रिस्ती समाजातील कार्निव्हल हे अशा प्रकारची बंधने शिथिल करावयाचे सण आहेत. ही बंधनांची शिथिलतासुद्धा काही तरी नियमांत बसलेली असते. ज्या वेळी कुठच्याच तऱ्हेचे नियम राहत नाहीत, कुठचे योग्य, कुठचे अयोग्य, कुठचे कर्म, कुठचे अकर्म हे समाजातील बहुसंख्य व्यक्तींना कळेनासे होते, तेव्हा व्यक्तींच्या जीवनात भयंकर क्रांती होते. सर्व तर्‍हांंची जीवनमूल्ये विस्कटून गेली आहेत, कशाला प्रमाण म्हणून राहिले नाही, अशा अवस्थेत समाज किंवा व्यक्ती दोन्ही जगू शकत नाहीत. जुनी प्रमाणे नष्ट होऊन नवीन प्रमाणे सर्वमान्य होईपर्यंत जो वेळ जातो, तो व्यक्तीला किंवा समाजाला अतिशय कष्टाचा असतो.

 ह्याच अनुषंगाने वाङमय, कला व संप्रदाय ह्यांचा विचार होणे