पान:Gangajal cropped.pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 ४८ / गंगाजल

छोटीकडे मित्रमंडळी आली म्हणजे उडत. चहा, कॉफी, विनोद चालला, तर हे शब्दही न बोलता आपल्या खोलीत जात. सर्वजणं गेली, म्हणजे छोटीवर राग निघे. “अशी तरुण मित्रमंडळी गोळा करतेस, त्यांच्याबरोबर हिंडतेस, मला खपायचं नाही!" वगैरे म्हणून शेवटी “आईच्या वळणावर गेली आहेस!" असं म्हणावं. छोटीची परीक्षा आली की ऐन गर्दीत ह्यांच्याकडे पाहुणे यायचे. म्हणजे स्वैपाक करून परीक्षेच्या वेळी हजर राहणं छोटीला भारी अवघड व्हायचं. खटका उडे. स्वैपाकच नीट झाला नाही, कॉफीच नीट नव्हती, वगैरे. छोटी रागावली, म्हणजे परत एकदा लहानपणापासूनचा पाढा वाचला जाई व शेवटी तिचा व तिनं न पाहिलेल्या आईचा उद्धार होई. छोटी किती तरी वेळा रडून-रडून डोळे सुजवून घेऊन, न जेवता, न खाता माझ्याकडे आलेली होती. थोड्या वेळानं शांत होऊन घरी जाई. कुठं जाणार? दुसरा मार्गच नव्हता!

 काही दिवसांपूर्वी छोटी अशीच दुपारी चार-पाचच्या सुमाराला आली. “मी आता परत घरी जाणार नाही. बाबा कुठे बाहेरगावी गेले आहेत. ते संध्याकाळी यायच्या आत मी निघून जाणार आहे!"

 "अग, तुझी परीक्षा दोन आठवड्यांवर आली आहे, चाललीस कुठे? परीक्षा होईपर्यंत तरी रहा."

 "तोच तर बाबांचा अंदाज आहे. किती बोललो, तरी ह्यावेळी चालेल, असं त्यांना वाटतं. मला परीक्षा नको. मी जाणार."

 "पण कुठं?"

 "मी मामाला निरोप पाठविला आहे. तो मला न्यायला येतो आहे. मी त्याच्याबरोबर गावी आजीकडे जाणार आहे."

 पुष्कळ सांगितलं, पण ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती व शेवटी ती मामाबरोबर गेली, असं मला कळलं.

 आज जवळजवळ दोन महिन्यांनी ती मला भेटली. अगदी घाईघाईनं तिच्या अक्काकडे दूरदूर ती चालली होती. बोलता-बोलता मला हलवून म्हणते, “अग, माझी आई मला सापडली!" मी ऐकतच राहिले.

 मी गावी गेले होते ना आजीकडे, तिकडे दोन-तीन आठवडे राहिले. अशीच एक दिवस दुपारी दिवाणखान्यात वाचीत बसले होते ती एक लहान सहा-सात वर्षांची मुलगी डुलत-डुलत आत आली. मी कधी त्या मुलीला पाहिलं नव्हतं; पण चेहरा ओळखीचासा वाटला. मी तिच्याकडे