पान:Gangajal cropped.pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
गंगाजल / ४७

अक्का-अक्का, त्यापलीकडे कधीमधी दादा, पण वडील म्हणजे घरी असणारी, जेवणारी, अक्काला कुरकुरत-कुरकुरत घरकामासाठी पैसे देणारी एक व्यक्ती, ह्यापलीकडे वडिलांबद्दल तिला काहीच माहीत नव्हतं. घरात खुर्च्या-टेबलं होती, -ती एका जागी असत,-वडील ही वस्तू तशाच तऱ्हेची पण हलणारी, चालणारी, बोलणारी होती. त्यांची कामं वेळच्या वेळी व्हावी, ह्यासाठी अक्का जपत असे, हेही तिला माहीत होतं. पण मुलं व वडील कधी बसून गप्पा मारलेल्या तिला आठवत नव्हत्या.

 घरात आईबद्दल कुणीच बोलत नसे. पण ह्या मुलांना चार दिवस मोकळेपणे जाऊन रहायला जी घरं होती, ती सर्व आजोळची, -आईचे भाऊ व आईचे आईवडील यांची! मुलं गावाला गेली की हटकून आजीकडे, नाहीतर मामाकडे जात, -शक्य तर वडिलांना न कळविता. किंवा त्यांना कळवून, -त्यांच्या कुरकुरीला न जुमानता! छोटी मातृमुखी आहे, असं आजोळी बोलत. त्यामुळे छोटीला आईबद्दल जास्तच राग येई.

 अक्का लग्न होऊन गेली, त्या वेळी छोटी अठरा वर्षांची असावी. ह्यानंतर ती मला अधूनमधून भेटायची. अठरा वर्षांची मुलं सर्वज्ञ असतात, ह्या रुबाबात तिनं मला सांगितलं होतं, “माझे बाबा म्हणजे संशोधन करणारं एक यंत्र आहे. ठरलेल्या वेळी उशीर न करिता खाणं, चहा, आंघोळीला गरम पाणी दिलं की झालं?" पण जसजसा वडिलांशी जास्त संबंध येत गेला, तसंतसं हे मूळचं वर्णन फारच बदलावं लागलं. 'मी तुझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्या, किती पैसे खर्च केले व करतो,' हे ते यंत्र बोलून दाखवू लागलं. छोटीला विचार पडे, अक्काही हेच ऐकत होती का? का हे एक नवीनच सुरू झाल आहे? मी तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या,' हे वाक्य मात्र ती गप्प बसून ऐकायची नाही-, “अक्का म्हणजे तुम्ही नव्हे-", 'माहीत आहे कुणी माझ केलं ते?', “बोलून दाखविणारं असतं एक, करणारं असतं निराळंच!" अशी वाक्यं ती वडिलांना ऐकवी. कधी वडील उत्तर देत नसत, कधीकधी शब्दावरून शब्द वाढे व कडाक्याचं भांडण होई. “अगदी थेट आईसारखी दिसतेस, आणि वागतेस पण आईसारखीच!" असं काही वडिलांनी म्हणावं व हिनं जवळजवळ वेड लागल्यासारखं ते नाकारावं, असं चालायचं. आईशी तुलना केली, आईचं नाव काढलं, की छोटी रागानं वेडी होते, हे लक्षात आल्यापासून वडिलांना तसे प्रसंग वारंवार आणण्याचा एक चाळाच लागला. लहानसहान बाबींवरून खटके उडत. पण मुख्य खटके