पान:Gangajal cropped.pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 ४६ / गंगाजल

 “तुला एक विलक्षण प्रकार सांगू का? अग, मला माझी आई सापडली!"

 ही पोर मला सात-आठ वर्षं माहीत आहे. तिची थोरली बहीण त्या वेळी माझ्या चांगली ओळखीची होती. हिचं नाव मी ऐकायची. प्रत्यक्ष पाच-सहादा पाहिली असेल, इतकंच. हिला पहिल्या वेळी पाहिलं, तेव्हा ती अठरा-एकोणीस वर्षांची असावी. जरा लठ्ठ; तोंडावर विशेष कोणताच भाव नाही; जरा अंगानं आडवी आणि तोंडावर बालमुखाची गोलाई, अशी ती मला दिसली. तिची थोरली बहीण अक्का फार हुशार, फार शांत, विचारी, वयाच्या मानानं जास्तच प्रौढ अशी होती. ह्यात काही नवल नव्हतं. ती आपल्या बापाचा आईनं अर्धवट टाकिलेला संसार संभाळीत होती.

 धाकटी पाच का सहा वर्षांची असताना, तिची आई नवऱ्याला व लहान मुलांना सोडून गेली होती. तेव्हापासून बाप, भाऊ व बहीण ह्यांना अक्कानंच संभाळलं होतं. घर मोठं स्वच्छ व व्यवस्थित ठेविल होतं. वडिलांचं ऑफिस, लहान भावांच्या शाळा ह्या वेळा साधून सगळ्यांचं जेवणखाण व्यवस्थित ठेविलं होतं. धाकटीची तर ती आईच झाली होती. नहाणं-माखणं, कपडेलत्ते सर्वच तिनं केलं. आपली आई नाही, असं धाकटीला कधी वाटलं असेल, असं दिसत नव्हतं. थोरली जितकी शांत,तितकी ही अवखळ आणि धसमुसळी. थोरली विचारी, तर ही अजून विचार करायला शिकली नव्हती. थोरलीसारखीच हुशार मात्र होती. शाळेत वरचा नंबर सुटला नाही, तसा कॉलेजात वरचा सुटला नाही, अक्कामुळे आईची वाण अशी भासली नाही, पण आई मला टाकून गेली, म्हणून तिच्याबद्दल तिरस्कार व राग मात्र मनात भरून राहिला होता. पण आयुष्यक्रम सपाट्यानं पालटला. अक्काचं लग्न झालं. एवढंच नव्हे, पण ती सातासमुद्रापलीकडं गेली. तिच्या मागोमाग दादाही अभ्यासाच्या निमित्तानं गेला. इतके दिवस अक्काच्या मायेत वाढलेली छोटी आता घरातली मोठी झाली. वडिलांना संभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आली.

 अक्कानं तिला स्वैपाकपाणी सर्व शिकविलं होतं. घरकाम तिला अवघड वाटलं नाही. पण वडिलांची ओळख मात्र नव्यानं होत होती. अक्काच्या राज्यात तिला वडिलांशी बोलण्याचा कधी प्रसंग आला नव्हता. वडिलांनी तिला कधी जवळ घेतलं आहे, कधी तिच्याशी, लहानसं का होईना, संभाषण केलं आहे, असं तिला आठवत नव्हतं. सर्व काही