पान:Gangajal cropped.pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ४५

अंथरूण घातलं होतं. आणि काय आश्चर्य! ती अगदी नेहमी यायची तशी आली. तिची हाक मला ऐकू आली. मी दार उघडलं. आम्ही दोघी त्यादिवशी फिरायला गेलो, एवढं आठवतं. पण कुठं गेलो, कशा गेलो, काय बोललो, हे नेहमीप्रमाणेच आठवत नाही. परत दुसऱ्या दिवशीही ती येईल, ह्या समजुतीत मी होते. पण ती आली नाही. मला परत नव्या घरी जाणं भाग होतं. इथलं काम संपलं होतं. राहण्यातही अर्थ नव्हता. ती परत कधी येईल, हे सांगता येत नव्हतं. मी कधी नव्हतं इतक्या अनिच्छेनं जुनं घरसोडलं, आणि परत नव्या घरी आले.

 त्या रात्री आणखी एक आश्चर्य घडलं. आई मला माझ्या खोलीच्या दारात दिसली. नेहमी दिसे तशीच. तिने हाक मारली, “माई!" मी खडबडून उठले व “आई!" म्हणत दाराकडे धावले. कुठली आई न कुठलं काय! माझ्या जागं होण्यानं, उतावीळपणानं आपल्या पायी आलेल्या आईला मी घालवून बसले होते. तरीही मी हिरमुसले नाही. माझ्या मनात आनंद भरून राहिला होता. आई नव्या घरी आली होती. आजच कशी आली? इतके दिवस का आली नव्हती?- मी आठवयाला लागले. दोन दिवसांपूर्वी मी जुन्या घरी गेले होते. ती भेटली. तेव्हा आपण फिरायला गेलो होतो. मी तिला इकडं आणलं होतं का? मला काही-म्हटल्या-काही आठवत नव्हतं. मी झोपेत असताना जाग्या असलेल्या मनानं ही युक्ती केलेली दिसते. तिला नवीन घर माहीत नव्हतं रस्ता सापडत नव्हता, ही साधी गोष्ट माझ्या जागेपणाच्या तार्किक व्यवहारी मनाला कळली नव्हती. पण कोणाला तरी माझी काळजी होती खास! मी जुन्या घरी गेल्यावर भेटायला आलेल्या आईला त्यानं इकडे आणलं असणार.

 काही का असेना, आईला घर सापडलं होतं, आणि मला आई सापडली होती.


 २ :-

 आज ती मला काही महिन्यांनी भेटली होती. ह्या दोन महिन्यांत तिचं कसं चाललं होतं, ती कुठं राहिली होती, वगैरे मी विचारीत होते व ती नेहमीप्रमाणे भराभर उत्तेजित स्वरात मला निरनिराळ्या हकीकती सांगत होती. सांगतासांगता ती एकदम थांबली. तिचे डोळे विस्फारले. ती मला हलवून मोठ्यानं म्हणाली,