पान:Gangajal cropped.pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



पाच :
आई सापडली!

 १ :-

 आई गेल्याला वर्ष झालं होतं, पण अजून ती कायमची गेल्यासारखी वाटत नव्हतं. एकतर तिच्या व माझ्या आजारामुळे आम्ही पूर्वीसारखी वारंवार भेटत नव्हतो, आणि दुसरं म्हणजे कित्येक महिने ती माझ्याकडे रहायला अशी आलीच नव्हती. पण अगदी खरं आतलं कारण म्हणजे अजूनही ती मला भेटायला यायची. ती येताना मला खिडकीतून दिसायची, 'माई' म्हणून तिच्या हलक्या मंजुळ आवाजात मारलेली हाक मला ऐकू यायची. मी दार उघडी. ती आली, म्हणजे आम्ही काय करीत असू, काय बोलत असू, ह्यातलं काही माझ्या लक्षात रहायचं नाही. फक्त ती येत असतानाची पांढ-या पातळातली, डोक्यावरून पदर घेतलेली तिची आकृती आज स्पष्ट दिसते व तिनं हळूच मारलेली हाकही अगदी स्पष्टपणे ऐकू येते. आम्ही दोघी काय बोलत असू, वा काय करीत असू, ते बहुधा फार समाधानाचं असावं, कारण त्या नंतरचा माझा सबंध दिवस अगदी आनंदाच्या धुंदीत जाई.

 नव्या घरी आले, आणि हे सर्व बदललं. इथं आल्यापासून आई भेटली नाही. तिनं नवं घर पाहिलं नाही. म्हणून मी मनातून खट्टू होतेच. आणि त्यातच तिच्या न येण्याची भर पडली. नवीन घरी आल्यावर घर लावण्यात, घराची सवय होण्यात एक-दोन महिने गेले. काहीतरी चुकल्या- चुकल्यासारखं वाटे, पण ते घराच्या नवीनपणामुळे असेल, असं म्हणून मी झटकून टाकी. जुन्या घरचा कोपरा-न-कोपरा कोणा-ना-कोणाच्या