पान:Gangajal cropped.pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ४१

लेकीची स्नेहाळ दृष्टी माझ्यावर लागली होती. मी अजून का बरे उठले नाही, म्हणून पाहायला ती आली होती.

 झोपेतील अनुभवांत मी अजून बुडून गेले होते. अवकाश आणि काळ ह्यांत काही धरबंधच राहिला नव्हता, इतके ते कालवले गेले होते. मागचं पुढे, पुढचं मागे. ह्या आयुष्यात अनुभविलेले, कधी न पाहिलेले असा सगळ्यांचा काला झाला होता. पाषाणयुगातून, ताम्रयुगातून, पेशवाईतून... कालपर्यंत माझे मन भटकत होते; असंख्य मैल तुडवून पाय दमले होते; अगणित जन्म अनुभवून मन थकले होते.

 युंगम्हणतो की, कधीतरी काही प्रसंगाने आपल्या पूर्वजांचे संस्कार

-----
काल का परवा, का आठवड्यापूर्वी थेऊरला चाललेले उत्खनन पहायला मी एकटीच मोटारीने गेले होते. गणपतीचे देऊळ डावीकडे टाकल्यावर हा एक खडबडीत रस्ता जातो, त्याने सुमारे अर्धा-पाऊण मैल गेल्यावर उत्खननापाशी मी पोहोचले. ख्रिस्तपूर्व १००० वर्षांची वस्ती असावी, असे सांगतात. एकमेकांवर लहान-मोठे दगड रचून वर्तुळाकार भिंती (-कोकणात ज्याला गडगा म्हणतात-) पूर्वी रचिलेल्या होत्या. (भिंती जाऊन फक्त पायाच्या दगडांची वर्तुळे मात्र शिल्लक राहिली होती) अशी एकाशेजारी एक ५०-५०, १००-१०० फूट अंतरावर कितीतरी वर्तुळे त्या माळावर होती. उत्खननात एका घराचे अवशेष एका वर्तुळात सापडले होते. घर कसले छप्पर म्हणायचे! त्याच वर्तुळात मासेमारीत वापरायचा एक तांब्याचा गळ सापडला होता, वर्तुळात उभे राहिले की, खाली मुळा-मुठा नदी दिसत होती. गडगे उभे असते, तर २५-४० गडगे दिसले असते. एका बाजूने गणपतीचे देऊळदिसत होते. 'थेऊर' हे ग्रामनाम थर-पुर ह्या पाली नावावरून आले असावे, अशी माझी कल्पना. म्हणजे थेऊरात एके काळी बुद्धमठ असावा. दगडी वर्तुळे ख्रिस्तपूर्व हजार वर्षांची (सुमारे महाभारतकालीन)- बुद्धमठ (?) ख्रिस्तशकाच्या अलीकडेपलीकडे कार्ले भाजे लेण्यांच्या वेळचा- नंतर पेशवे-