पान:Gangajal cropped.pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


चार :
एक रात्र? की युगानुयुगे?


 दिवसभर प्रवास करून मी थकले होते रात्री तिने निजण्याची खोली दाखविली, तेव्हा वाटले की, पाठ टेकली की झोप येईल.

 प्रत्येक घराचे आणि भोवतालच्या जागेचे स्वत:चे असे काही एक स्वरूप असते. नेहमी रहायची जागा बदलली की नव्या जागेच्या परकेपणामुळेच मन भांबावते. तसे माझे झाले. खिडक्यांतून भिंतीवर उजेड पडत होता. नेहमी ज्या बाजूला उजेड पडायची सवय, तेथे तो नव्हता. मनात विचार करावा लागला. ह्या खोलीच्या बाहेरचा रस्ता पूर्वेला आहे. रस्त्यावरचे दिवे पुण्यामध्ये घराच्या उंचीवर नाहीत. त्यांचा प्रकाश अगदी निराळ्या भिंतीवर दिसतो. एवढेच नव्हे, तर निराळ्या उंचीवर काही एका कोनाने तो दिसतो आहे. ही गोष्ट समजून घ्यायला थोडा वेळ लागला. एवढ्यात एक गाडी धडधडत गेली. रस्ता निराळ्या दिशेला म्हणून आवाजही निराळ्या दिशेला. भिंतीवर दिव्याच्या प्रकाशात पानांच्या सावल्या नाचत होत्या. ते चित्रही सर्वस्वी अनोळखी! काही पाने लांब, रुंद, मोठी होती. काही लांब, चिंचोळी होती. काही इवलीशीच वाटोळी होती. अमकी सावली अमक्या पानाची किंवा अमक्या फांदीची, हे समजायला रात्री काही मार्ग नव्हता. मी उशिरा आले होते. त्यामुळे बागही पाहिलेली नव्हती. 'कुठचे बरे झाड असावे?' असा विचार करीत पडले होते.

 एवढ्यात झांजा वाजल्या. भजनाचे शब्द नाही, तरी सूर ऐकू येऊ लागले. लक्षात आले की, शेजारी एक देऊळ आहे. भजन चालू असेपर्यंत काही केल्या झोप येईना. भजन जोराने चालले होते असे नव्हे, पण निजताना