पान:Gangajal cropped.pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३६ / गंगाजल


एक समजूत आहे. शकू हल्ली आपला बहतेक वेळ कटंबनियोजनाच्या प्रचारात घालविते. गेली कित्येक वर्षे ती हे काम करीत आहे. हे काम पगारी नाही. त्यात तिला द्रव्यप्राप्ती होत नाही. रहावयाला अप्पांचे घर नसते, तर तिला हे कार्य करणे जड गेले असते, व पुढेही जड जाईल. तिच्या ह्या आयुष्यक्रमात मोठा ध्येयवाद आहे, हे अप्पांनासुद्धा पटेल. पण तिचे कार्य सतत चालू राहण्यासाठी आपण तिच्यासाठी काही केले पाहिजे, ह्याची जाणीव मात्र त्यांना नाही. जी गोष्ट शकूची, तीच दुसऱ्या अर्थाने सईची. सई कलावंत आहे, तिने एका कलावंताशीच लग्न केले आहे, कलावंताचे जीवन बरेच खडतर असते, थोडासा का होईना, पण ठरलेला पगार महिन्याच्या महिन्याला मिळण्याची त्यात फारशी शक्यता नसते. मग रहायला स्वतःच्या मालकीच्या दोन खोल्या ही कल्पनाच नको. कलेच्या मागे लागणे हाही एक प्रकारचा ध्येयवाद आहे. दोन्ही मुली दोन तर्‍हानी अशा परिस्थितीत असताना आपले राहते घर त्यांनी मृत्युपत्रान्वये एका संस्थेला दिल्याचे ऐकून मला तर धक्काच बसला. अप्पांच्याजवळ गडगंज संपत्ती नाही. घरी मोटार नाही. दोन मुलींना पोटापुरते व डोक्यावर निवारा एवढे ठेविले, तर अप्पा आपल्या सार्वजनिक कर्तव्याला चुकले, असे मला मुळीच वाटत नाही. पण ह्या बाबतीत अप्पा आपल्या पिढीतील काही देशभक्तांचे व सुधारकांचे प्रतिनिधी आहेत.

 मला पुष्कळ वाटते की, एकदा त्यांच्याशी ह्या बाबतीत रागारागाने वाद घालावा. पण माझ्या आजपर्यंतच्या भूमिकेमुळे अजूनपर्यंत तरी मला ते तितकेसे जमले नाही. आणि मुलीबाळींनी विरोध केला, म्हणून हा मोठा पुरुष आपला विचार बदलील असेही वाटत नाही.

 एका दृष्टीने त्यांचा स्वभाव, वागणूक जीवनाचा प्रवाह सर्व काही एका . विशिष्ट कालखंडाचे द्योतक वाटतात. पण दुसऱ्या बाजूने पाहिले, तर त्यांची असाधारण बुद्धी, अपार वात्सल्य व बालसुलभ ऋजुता ह्यांचा मिलाफ अनन्यसाधारण आहे. त्यामुळे कोठल्याही रेखीव चौकटीत त्याचे आयुष्य बसविताच येत नाही.

१९६१

 हे लिखाण लिहून झाल्यावर अप्पांकडे पाठविले व त्यांना विचारले "तुमची हरकत नसली, तर छापून काढायचे म्हणते आहे!" त्यांचे उत्तर