पान:Gangajal cropped.pdf/34

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ३५


आज?" तिने वाईट तोंड करून, गाल फुगवून मला सांगितले, “काय करायचं? हे अप्पा आहेत ना! मुळीच ऐकत नाहीत. मला म्हणतात, एम.ए. हो. रोज पाठीमागं लागतात. शेवटी घातलं एकदा नाव. त्यांना एकदा कळलं की, माझ्याच्यानं अभ्यास होत नाही, की देतील नाद सोडून!" सईचा हा प्रयत्न फारच लवकर यशस्वी झाला व परत काही मला ती विद्यापीठाच्या आवारात भेटली नाही! अप्पांनी कंटाळून नाद सोडून दिला असावा. ह्याही पोरीने आईप्रमाणेच आपले लग्न जमविले. तेही आईप्रमाणेच एका कलाकाराशी. आणि जसे तिच्या आईचे लग्न अप्पांना पसंत नव्हते, तसे हिचे लग्न आईला पसंत नव्हते. शकूने हे लग्न आपण लावणार नाही, असे साफ सांगितले व अप्पांनी नातीचे कन्यादान केले. अगदी वैदिक पद्धतीने व ब्राह्मणांच्या मंत्रघोषांत! ह्या सर्व प्रसंगाचा त्यांच्या स्वत:च्या आयुष्याशी काय संबंध आला, हे नेहमीप्रमाणे दोन मोजक्या वाक्यांत त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले... “मुलांच्याबद्दल नसत्या महत्वाकांक्षा ठेवू नयेत. मी नाही का शकूबद्दल उगीचच मनाच्या कल्पना केल्या होत्या?" वाक्ये दोनच. पण त्यांत सबंध आयुष्याचा अनुभव भरलेला होता. आपल्या महत्वाकांक्षेपायी मुलीला मनात नको तो अभ्यास करायला लाविले, त्याची पुनरावृत्ती त्यांनी नातीच्या बाबतीत होऊ दिली नाही. शकू रागावली, म्हणून त्यांच्या हृदयाची कोण कालवाकालव झाली; पण म्हणून ते आपल्या कर्तव्यापासून ढळले नाहीत. ह्या सर्व गोष्टी नेहमीच्या सहजपणे आणि प्रसन्नपणे त्यांनी केल्या. त्यात नातीबद्दलचा जिव्हाळा जसा होता, तसाच आयुष्यातील काही प्रसंगांवरून धडा घेण्याचीही वृत्ती त्यात होती. सईच्या लग्नाच्या दिवशी माझ्या राहून-राहून मनात येत होते की, मिस्टर बेनेटची भूमिका वठवू बघणाऱ्या अप्पांनी शेवटी सर टॉमसचीच भूमिका पार पाडली.

 वयाच्या ऐंशीव्या वर्षापुढे अशा त-हेने बुद्धीचा असामान्य समतोलपणा व लवचिकपणा दाखविणे अप्पांना शक्य झाले, पण त्याचबरोबर मी ज्याला प्रातिनिधिकपणा व पारंपरिकपणा म्हणते, तोही दुसऱ्या एका घटनेमुळे मला नुकताच परत एकदा कळला. एखाद्या संस्थेमध्ये, विशेषतः शिक्षणसंस्थेमध्ये कमी पगाराची नोकरी धरून ती वीस वर्षे करीत राहणे हे अप्पांच्या मते ध्येयवादाचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे आपल्या द्रव्यापैकी देववेल तितके द्रव्य एखाद्या शिक्षणसंस्थेला देणे हे आपले कर्तव्य आहे, ही त्यांची त्यांच्या वेळेच्या परंपरेप्रमाणे ठाम झालेली