पान:Gangajal cropped.pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ३३


वात्सल्य. त्यामुळे त्यांना कितीही माया वाटली, तरी त्यांची समतोल कर्तव्यतत्पर वृत्ती ढळत नाही, व ते कितीही कर्तव्यनिष्ठुर असले, तरी त्यांची माया कमी होत नाही. हा अनुभव घरच्या माणसांचाच आहे असे नव्हे, तर विद्यार्थ्यांचाही आहे.. ते रागावतील, शिक्षा करितील, नापसंती कडक शब्दात व्यक्त करितील. पण कर्तव्यामुळे त्यांची प्रेमाची आर्द्रता कधीही नाहीशी होत नाही. त्यांच्या हातून खाल्लेल्या माराच्या आठवणी शकू रसभरितपणे सांगते. त्यांच्याशी तिची कितीतरी भांडणे झाली आहेत, पण कडवटपणा मुळीच नाही. मला ते पुष्कळच रागावले असणार, पण मला आठवते आहे ती त्यांची माया. माझे लग्न झाले, तेव्हा मला एका हाती हजार रुपयांचा आहेर त्यांनी केला. आमच्या संसाराच्या त्या वेळेच्या परिस्थितीत ते दहा हजारांच्या मोलाचे होते. मी अमेरिकेत होते, तेव्हा मला अंजायना नावाचा हृदयाचा विकार होऊन मी निजून आहे, हे ऐकिल्याबरोबर स्वत:ची प्रकृती बरी नसताही भारतसेवक समाजाच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांनी कैलासवासी श्रीनिवास शास्त्री अंजायनासाठी काय औषध घेत होते, त्याची माहिती काढून आणून त्यांनी मला पाठविली! अमेरिकेत सर्व आधुनिक उपचार मजवर होत असणार, पंचवीस वर्षांपूर्वी पुण्याला श्री. शास्त्री जे औषध घेत असत, ते एव्हाना जुने झालेले असणार, हा विचारही ते विसरून गेले होते. अजूनही पंधरा दिवसांनी, महिन्याने माझे कसे काय चालले आहे हे पहायला दोन मैल चालत येतात. 'फार काम करू नको; विश्रांती घे,' म्हणून मला बजावितात.

 अप्पा विलायतेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये दिवस-न-दिवस आणि वर्ष-न वर्ष केवळ विलायती पोषाखात वावरत असत. अजूनही विलायती पोषाख त्यांच्या चांगला अंगवळणी आहे. पण पुण्याला असले की, घरात धोतर आणि शर्ट आणि बाहेर पडताना त्यावर कोट, उपरणे आणि पगडी हा त्यांचा सर्वांना माहीत असलेला पोषाख, हे त्यांच्या पारंपरिकपणाचे आणखी एक लक्षण. त्यांच्या खाण्यात, बोलण्यात अशा कितीतरी गोष्टी आहेत की, त्यांत त्यांचे लहानपणचे संस्कार दिसून येतात. पण तेच अप्पा आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी आपले वर्तन व विचार बदलू शकतात, ह्याचे एकच घरगुती उदाहरण देते.

 शकू लहानपणापासून हुशार. शाळेत तर तिचा पहिला-दुसरा नंबर असेच, पण कॉलेजातही तिने कधी पहिला वर्ग सोडला नाही. तिने सायन्स