पान:Gangajal cropped.pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
गंगाजल / ३१



असताना त्यांनी पोटसडामबद्दल लिहिलेले शब्द वाचले त्या वेळची. पोटसडाम बर्लिनशेजारी आहे. तेथे फ्रेडरिक द ग्रेट ह्या राजाने पॅरिस जवळच्या फ्रेंच राजांनी बांधलेल्या व्हर्साय ह्या राजवाड्याची नक्कल करून एक गचाळ राजवाडा व बाग उठविली आहे. अप्पांनी आपल्या आत्म- चरित्रात गंभीरपणे एक असे वाक्य ठेवून दिले आहे की, “पोटसडामचा राजवाडा सौंदर्याच्या बाबतीत काही व्हर्सायच्या राजवाड्याच्या तोडीचा नाही.' औरंगाबादचा बिबीचा मकबरा ही दगडाचुन्यात बांधलेली ताजमहालची प्रतिकृती ताजमहालइतकी चांगली नाही, असा गंभीर शेरा देण्याचाच हा प्रकार! बारकावे त्यांना समजत नाहीत, ह्याचे एक उदाहरण म्हणजे शकूने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करायचे ठरविल्यावर ते रागावले होते व लग्न झाल्याचे तिने कळविल्यावर तिला त्यांनी लग्नाची भेट म्हणून दोनशे रुपये पाठविले! दुसऱ्या कोणी हे केले असते, तर ह्या कृतीत किती अर्थ-की अनर्थ दिसला असता! अजून ह्या प्रसंगाची आठवण झाली की, शकू चिडते. पण त्याचे मूल्य तिच्याच शब्दांत द्यायचे म्हणजे “अप्पा फार पारंपरिक (traditional) आहेत. अमक्या वेळी एखादी गोष्ट करायची, म्हणून ते करितात. तीतील अर्थच मनात घेत नाहीत." हे मूल्यमापन मला सर्वस्वी पटत नाही, पण ह्या विचित्र देणगीचा(!) अर्थ मलासुद्धा दुसरा लाविता येत नाही.

 अप्पांचे जिवलग मित्र एक बालकराम. त्यांच्यानंतर अप्पांची इतकी अंत:करणापासून कोणाशीच मैत्री झाली नाही. पण त्यांच्याजवळ वात्सल्याचे भांडवल मात्र कधी न संपणारे असे आहे. त्यांच्या आयुष्यात एका दृष्टीने त्यांनी आपल्या बायको-मुलीला सहभागी केले नाही. पण तसे करणे त्यांना अवघड जाते म्हणून, स्वत:च्या मोठेपणामुळे नव्हे. अप्पांवर अतोनात प्रेम करणारी माणसे खूप आहेत. स्वत:च्या मुली-नातींखेरीज भाऊ-भावजया, त्यांची मुले, मुलांची मुले अशा सर्वांवर, माझ्या कुटुंबावर, त्यांची फार माया आहे. शकू व सई ह्यांचे मित्रमंडळ घरी येते व अप्पांच्या आकर्षणात सापडून ती सर्व मंडळी त्यांची होतात. पण व्यक्तिपूजा व तीमागची आंधळी भक्ती किंवा तीमागे असणारी पुढेपुढे करण्याची वृत्ती ही त्यांच्यात किंवा त्यांच्या आसपास चुकूनही दिसली नाही.

 मला वाटते, तेही अप्पांच्या स्वभावविशेषामुळेच. मी लहान असताना अप्पांच्या घरी त्या वेळी भारतात प्रसिद्ध असलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती येऊन