पान:Gangajal cropped.pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२८ / गंगाजल


दुसऱ्या काही अडचणींना तोंड द्यावे लागले, तर ते कधीही बायकोबरोबर विचारविनिमय करीत नसत. अप्पांच्या निवडणुकीच्या वेळेला सईताईनी मोठ्या उत्साहाने काम केले. पण त्यांच्यात तात्त्विक विषयांवर चर्चा झालेली मी कधी ऐकली नाही. अप्पा सईताईंना कधी रागावलेलेही मला आठवत नाहीत. त्यांच्या खर्चापायी, त्यांच्या निरनिराळ्या छंदापायी ते टेकीस येत. पण बेनेटचे एखादे वाक्य बोलून मनाचे समाधान करून घेत. बायकोशी वागण्यामध्ये 'प्रेयो मित्रम' ह्या भवभूतीच्या व्याख्येपर्यंत ते कधी पोहोचलेच नाहीत, असे मला वाटते. ह्या वागण्यामध्ये प्रेमळपणा होता, पण त्याचबरोबर एक त-हेचे अंतर कायम राहिले. ज्ञानाने, वयाने, अनुभवाने कमी असणाऱ्या माणसाशी जे वागणे राहते, तसेच ते शेवटपर्यंत राहिले. अप्पांनी सईताईंना मिसेस बेनेटची भूमिका बहाल केली. तेव्हा एखादे वेळेस तरी सईताईंनी जेन ऑस्टेनच्याच एखाद्या कादंबरीतील पढतमूर्खाची भूमिका अप्पांना दिली असती, तर ती बरोबरी झाली असती. पण तशी बरोबरी करणे सईताईंच्या कधी स्वप्नातही आले नसणार. अप्पांचे बायकोशी हे वर्तन बऱ्याच दृष्टीने प्रातिनिधिक स्वरूपाचे होते. महादेव गोविद रानडे, अण्णासाहेब कर्वे वगैरे मंडळींची आपल्या कुटुंबाशी वागणूक अशाच त-हेची होती. बायकांना आपल्याबरोबर एखाद्या सभेला घेऊन जाणे शिकविणे वगैरे हे लोक करीत असत, पण जुन्या काळच्या करत्या पुरुषाची बायकोच्या बाबतीत जी भूमिका होती. तीच त्या सर्वांची होती. समाजकारण, राजकारण वगैरे विषय खास पुरुषांचे आहेत; त्यांची चर्चा पुरुषा-पुरुषांमध्ये होईल, पण घरात पोरीबाळी व बायको वगैरेंपूढे नाही. अप्पांच्या जीवनाचा आणखी एक विशेषही त्या वेळच्या पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचेच प्रतीक मानला पाहिजे. आप्पांनी आपल्या बायकोशीच काय, पण कोणाही स्त्रीजवळ आपले मन कधी उघडे केले नाही. कोणीही बाई त्यांना तितकी जवळची वाटली नाही; पण कालिदासाच्या म्हणण्याप्रमाणे 'दयितास्वनवस्थित' असे मात्र ते कधीच झाले नाहीत. अंत:करण उघडे करून बोलावे. किंवा दुसऱ्याने आपल्याजवळ ते तसे करावे, अशी कल्पना त्या वेळच्या पुरुषांना नसावीच.

अप्पा राजकारणी व्यक्ती होते, पण सार्वजनिक जीवन ते घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवीत असत. त्यामुले त्याचे पडसाद क्वचितच उमटत 'प्रासाद शिखरस्थोऽपि काको न गरुडायते' किंवा 'पशुपाल का शिशुपाल?