पान:Gangajal cropped.pdf/26

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / २७


होई व अशा त-हेने माझ्या मनाची एक विशिष्ट घडण बनण्याला ते कारणीभूत झाले. मी त्यांच्याइतकी बुद्धिवादी कधीही झाले नाही व निरीश्वरवादीही झाले नाही. पण त्यांच्याजवळ केलेल्या वाचनामुळे ह्या विचारसरणीमागील मनोभूमिका व ध्येयवाद मला समजू शकला. अलीकडे-अलीकडे तर मी बरोबरीच्या नात्याने त्यांच्याशी वाद घालू शकते. तेही कधी वादाला कंटाळत नाहीत. ह्याप्रमाणे मला नकळत मी एका व्यक्तीपासून दुरावत होते व एका व्यक्तीच्या जवळ येत होते.

 अप्पा विलायतेहून आले, तेव्हा त्यांची पहिली बायको वारली होती व त्यांनी त्या वेळच्या मानाने सुशिक्षित (म्हणजे मॅट्रिक झालेल्या), सुस्वरूप व सुधारक घराण्यातील एका मुलीशी लग्न केले. सईताई लग्न झाल्यावरही काही दिवस कॉलेजात जात असत. पण पुढे काही शिकल्या नाहीत. मागे सांगितलेल्या कारणामुळे वाचन, शिक्षण, एवढेच काय, पण जीवनाचा अनुभव या दृष्टीनेही त्या कधी अप्पांची बरोबरी करू शकल्या नाहीत. मला राहून-राहून प्रश्न पडतो तो असा की, अप्पांनीसुद्धा जाणूनबुजून मन:पूर्वक असा प्रयत्न कधी केला होता का? अगदी अशिक्षित बायकोसुद्धा शिकलेल्या नवऱ्याबरोबर संसार करून रोजच्या घरगुती व्यवहारात त्याची बरोबरी करू शकते, हे मी पाहिले आहे. अप्पांना ते काही जमले नाही, किवा तशी त्यांची दृष्टीच नव्हती, असे मला वाटते. लहानपणी सईताई आम्हाला सांगत ती एक गोष्ट मी विसरू शकत नाही. त्यांनी सांगितले की, लग्न झाल्यावर अप्पा रोज हिराबागेत टेनिस व मागून पत्ते खेळायला जात असत. ते पाचाला जायचे ते चांगले साडेआठपर्यंत परत येत नसत. एवढा वेळ प्रिन्सिपॉलच्या बंगल्यामध्ये बायकोला एकटे ठेविले, म्हणजे कंटाळा येईल; म्हणून ते सईताईंना गाडीतून घेऊन जाऊन वहिनींकडे पोहोचवीत, व येताना बरोबर आणीत. येताना त्या दोघांचा एकी का-बेकीच्या धर्तीवर एक मोठा मजेदार खेळ चाले. त्या वेळी म्युनिसिपालिटीचे दिवे रॉकेलचे असत. प्रत्येक दिव्याच्या भोवती खुपसे किडे जमत व ते खायला पाली येत. प्रत्येक दिव्यात किती पाली असतील, त्यांचा अंदाज बांधीत व कुणाचा अंदाज बरोबर हे पाहत पाहत हे जोडपे घरी पोहोचत असे. मला वाटते, दररोज पालींचा हिशेब करून बहुतेक अप्पा एक आलेख तयार करीत असले पहिजेत.

 अप्पांचा कॉलेजातील सहकाऱ्यांशी काही मतभेद झाला, किंवा