पान:Gangajal cropped.pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२६ / गंगाजल


त्याचे एक कारण, तसेच त्या दोघांचा स्वभाव हेही दुसरे कारण. सईताई सुरेख होत्या, प्रेमळ होत्या, त्यांना काव्याची गोडी होती, पण त्यांचे मन लहान मुलाचे, अविकसित असे राहिले. संसारातील अनुभवांनी त्यात जी खोली यायची, ती आलीच नाही. इतकेच नाही, तर मानसिक विकृतीला बळी पडून त्यांची सगळीच मानसिक वाढ एक प्रकारे खुंटली होती. शकू त्यांची पहिली मुलगी. तिच्या पाठोपाठच दीड वर्षात त्यांना मुलगा झाला आणि तो वर्षाच्या आतच गेलाही. त्या दु:खाने त्यांच्या मनावर काही विलक्षण परिणाम झाला असला पाहिजे. माझ्या लहानपणी मला ह्या गोष्टी कळत नसत, पण आता मात्र त्यांची संगती लागते. आपल्याभोवती कोणी तरी लहान मूल असल्याखेरीज त्यांना जेवणच जात नसे. आम्ही सगळी मुले जेवून शाळेत गेलो, म्हणजे त्या शेजारच्या लिमयांच्या घरची मुलं तरी आणीत, नाही तर गुण्यांच्या मधूला तरी घेऊन येत व आपल्या समोर बसवून जेवत. सईताईंच्या बरोबर बाजारात जायला मोठी गंमत असे. त्या नेहमी मला आणि शकूला काही तरी खाण्याची, खेळण्याची किंवा लेण्याची वस्तू घेऊन देत. स्वतः इतके जिन्नस खरेदी करीत की, त्यांची मागाहून येणारी बिले भागवता-भागवता बिचाऱ्या अप्पांच्या अगदी नाकी नऊ येत. त्यांना खेळायच्या वस्तू विकत घ्यायचा फार नाद. हटकून एखादी तरी बाहुली त्या दर महिन्याला विकत आणीत असत. मी लहान असताना सर्वच गोष्टींबद्दल त्यांचे ऊतू जाणारे औत्सुक्य व आनंद एवढ्यापुरतीच ही विकृती होती. पुढे मात्र रोग फारच बळावला, तो थेट त्यांच्या मृत्यूपर्यंत. त्यांचे वर्षाचे काही महिने पहाटेपासून रात्रीपर्यंत अतिशय धांदल, समारंभ, हालचाल ह्यात जात; व काही महिने अगदी स्वस्थ बसून, नाही जेवण, नाही खाणे, नाही आंघोळ, केवळ उदासीनता- असे जात. त्यांच्या प्रेमळपणाने मी त्यांच्याकडे आकर्षित झाले खरी, पण पुढे ह्या आकर्षणाचे रूपांतर करुणेत झाले.

 अप्पांच्याबद्दल मात्र पहिल्याने भिऊन वागणारी मी हळूहळू त्यांच्याकडे ओढली गेले. त्यांचे मोठ्याने हसणे किंवा बोलणे, किंवा त्याच्या वागण्यातील खडबडीतपणा ह्यांच्या मागचे वात्सल्य मला जाणवू लागले. इंग्रजी वाङमयाची गोडी त्यांनीच मला लाविली. पहिल्यांदा मुलांच्या अदभुत-कथांपासून सुरुवात झाली. हळूहळू प्रसिद्ध-प्रसिद्ध कादंबऱ्या वाचून झाल्या. त्यामागून स्पेन्सर, मोर्ले, मिल वगैरेंचे ग्रंथ मी त्याच्याजवळ वाचले. ग्रंथ वाचताना मोठेपणी अधूनमधून त्यावर संभाषणही