पान:Gangajal cropped.pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.




गंगाजल / २५

होते, जॉर्ज एलियटचे ‘सायलस मार्नर' होते. ‘सायलस मार्नर' ही आम्हा सगळ्यांनाच आवडणारी कथा होती. आम्ही दोन-तीनदा तरी ती वाचली असेल. माझ्या आयुष्यात ज्या काही अत्यंत सुखाच्या आठवणी आहेत, त्यांमध्ये ह्या एकत्र कौटुंबिक वाचनाच्या आठवणी आहेत.

 अप्पांनी आम्हाला आधुनिक ललितलेखक मॅट्रिक पास होईपर्यंत वाचू दिले नाहीत. शाँ तर त्यांना बिलकुल आवडत नसे. पण आम्ही तो भांडून वाचलाच. पण शाँ किंवा बॅरी ह्यांची नाटके व वेल्स, बेनेट किंवा गॉल्सवर्दी यांच्या कादंबऱ्या कौटुंबिक वाचनात कधी आल्या नाहीत. अप्पांच्या मते पूर्वी झालेल्या ब्रिटिश लेखकांच्या तोडीचे हे नवे लेखक नाहीत.

 अप्पांची वाङमयीन आवड त्यांच्या मनाच्या ठेवणीची निदर्शक म्हणावी की ह्या लेखकांनी ती ठेवण तशी बनविली, हे काही मला नीटसे सांगता येत नाही. मूल आपले गुण घेऊन जन्माला येते, ही गोष्ट तर खरीच, पण संस्कारक्षम वयामध्ये झालेल्या वाचनाचाही परिणाम मनावर होत असला पाहिजे. मिल, स्पेन्सर, बेंथम ही मंडळी बुद्धिवादी, सुधारणावादी व व्यक्तिस्वातंत्र्याची भोक्ती अशी होती. ह्या सर्वांच्या नीतिमत्तेबद्दलच्या कल्पना त्या वेळच्या काळाप्रमाणे ठाम अशा होत्या. नवीन मानसशास्त्राचा विकास त्या वेळी झालेला नव्हता. त्याचप्रमाणे समाजशास्त्राचाही प्रसार त्या वेळी इतका झालेला नव्हता. मनुष्य आडवाटेने जातो, त्याला कारणे म्हणून लहानपणी घडलेले संस्कार, वैफल्य, समाजरचनेचे दोष वगैरे दाखवून त्याच्या कृतीचे आकलन आणि त्याचबरोबर थोडेबहुत समर्थन हल्लीच्या वाङमयात जितके होते, तसे अप्पांना आवडणाच्या लेखकांत मुळीच दिसून येत नाही. बनियनच्या 'पिल्ग्रिम्स प्रोग्रेस' मध्ये म्हटल्याप्रमाणे सदाचरणाची वाट अगदी सरळ व अरुंद अशी होती. त्या वाटेने जाणार्‍याला कुठे फाटा भेटायचा नाही, किंवा वाटेवरच्या वाटेवरच जरा पाऊल इकडचे तिकडे करायला जागा नव्हती. जेन ऑस्टेनच्या सगळ्या कादंब-यांतही हीच वृत्ती दिसून येते. तिने रंगविलेले काही खलनायक किंवा तिच्या मताने कसोटीस न उतरलेल्या स्त्रिया तिच्या नायक-नायिकांपेक्षा एक दोन उदाहरणांत तरी जास्त आकर्षक वाटतात. पण कुठे तरी चूक घडल्यामुळे जेन ऑस्टेनने त्यांना भरपूर प्रायश्चित्त दिलेले आहे.

 सईताई आणि अप्पा ह्यांच्याबद्दलच्या माझ्या सुरुवातीच्या भावना हळूहळू बदलत गेल्या. मी मोठी होत होते, माझी समज वाढत होती, हे जसे