पान:Gangajal cropped.pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 २० / गंगाजल

कॉलेजातील विद्यार्थी व अप्पांचे मित्र ह्यांपर्यंत सगळ्यांनाच, त्या हव्याहव्याशा वाटत. ही सगळीच चाहते -मंडळी अप्पांच्या आवडीची नसत. मला वाटते, मी जी अप्पांच्या घरी घुसले, तीसुद्धा थोडीशी त्यांच्या मनाविरुद्धच. माझे त्यांच्या घरात येणे सईताईंखेरीज इतर कुणाला फारसे रुचले असेल, असे वाटत नाही. त्यामुळे मीही कित्येक महिने सईताईंच्याच भोवतीभोवती असे. पहिले काही दिवस तर मला असा अनुभव आला की, त्यामुळे घरातल्या इतर वडील माणसांपासून शक्य तितके लांबच राहण्याचा मी प्रयत्न करू लागले.

 ज्याच्याशी मनात नसताना पदोपदी संबंध येई व मनस्ताप होई, असे एक मनुष्य म्हणजे वहिनी- सईताईंच्या आई. ह्या बाई एक अपत्य झाल्याबरोबर विधवा झालेल्या होत्या. त्या पुण्यात-गावात राहत असत. पण सईताईंचे लग्न झाल्यावर काही वर्षांनी सईताई आजारी पडल्यामुळे त्या लेकीच्या घरी रहायला म्हणून ज्या आल्या, त्या मरेपर्यंत तेथेच राहिल्या. संसार करायच्या दिवसांतच विधवा होऊन बोर्डिंगमध्ये राहिल्यामुळे त्यांची संसाराची सर्वच आशा अपुरी राहिलेली होती. अचानकपणे त्या लेकीच्या संसारात आल्या होत्या आणि तो त्यांनी अतिशय नेकीने, काटकसरीने, पैशाच्या दृष्टीने अप्पांचे हित बघून केला. पण त्यांची काटकसर, रूक्षपणा, क्षुद्रपणे लोकांना घालून-पाडून बोलायची सवय ह्यांचा घरात सर्वांनाच त्रास होई. तरीही पहिल्याने अपरिहार्य म्हणून व मागून कर्तव्यबुद्धीने अप्पांनी ह्या बाईंचा सासुरवास आपल्या स्वत:च्या घरात सहन केला. ह्या बाई काही वेळेला सकारण, पण ब-याचदा निष्कारण मला रागावत व माझा दु:स्वास करीत आणि त्यामुळे होता-होईतो त्यांचा संबंध टाळायचा, अशी माझी प्रवृत्ती असे.

 विलक्षण गोष्ट म्हणजे अप्पांच्याबद्दलही मला अतिशय भीती वाटत असे. अप्पा कधीही मला अपमानकारक बोलल्याचे किंवा जोराने रागावल्याचेसुद्धा आठवत नाही. तरी पण त्यांचा मोठा आवाज, आकडेबाज मिशा, गडगडाटी हसणे, उंच व भव्य देह ह्यांच्यामुळे की काय, मला त्यांची भयंकर भीती वाटत असे, हे मात्र खरे. इतरही लहान-लहान कारणे भीती वाटायला होती. एक म्हणजे मला गणित बिलकुल येत नसे; आणि अप्पा कधीकधी आम्हा मुलांना तोंडचे हिशेब घालीत व उत्तरे विचारीत. अशा वेळी अंग चोरून मी कितीही लहान व्हायचा प्रयत्न केला, तरी त्यांच्या