पान:Gangajal cropped.pdf/18

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
तीन :
दुसरे मामंजी

 मी कर्व्यांची सासुरवाशीण झाले. त्या दिवशी अप्पा माझे मामेसासरे झाले. माझी मुले शकूला (अप्पांच्या मुलीला) ‘आत्याबाई' म्हणतात. पण खरे म्हणजे हे नाते माझ्या लक्षातच येत नाही. कर्व्यांच्या घरच्या कोणाचीही ओळख होण्याआधीच किंबहुना ते नावही माहीत होण्याच्या आधी मी अप्पांच्या घरची झाले. माझ्या मनाच्या घडणीत त्यांचा वाटा इतका आहे की, खरे म्हणजे ते माझे दुसरे पिताजीच म्हणायला पाहिजेत.

 मी त्यांच्या घरी गेले, तो प्रसंगही मोठा चमत्कारिक. मी त्या वेळेला हुजूरपागेच्या बोर्डिंगात राहून शिकत होते. कुणाबरोबर तरी दुपारची खेळायला म्हणून फर्गसन कॉलेजातल्या त्यांच्या बंगल्यावर गेले होते. तेथे सईताई भेटल्या व मला त्यांच्याबद्दल काही विलक्षण ओढ वाटली. गंमत अशी की, त्यांनाही माझ्याबद्दल काही विशेष आकर्षण वाटले असले पाहिजे. त्यांनी मला विचारले, “आमच्याकडे रहायला येशील का? मीही चटदिशी 'हो' म्हणून गेले. सईताईंच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी माझ्या आई-वडिलांची चौकशी करून, ब्रह्मदेशात माझ्या वडिलांना पत्र लिहून मला आपल्या घरी ताबडतोब रहायला आणिले. आणि माझ्या वडिलांनी आपल्या स्वभावाप्रमाणे बोर्डिंगात पैसे पाठवायचे ते परांजप्यांकडे पाठवायला सुरुवात केली. तेव्हापासून काही वर्षे सतत व काही वर्षे येऊन- जाऊन मी त्यांच्या घरी होते.

 सईताई म्हणजे सीताबाई... अप्पांचे दुसरे कुटुंब. त्यांना माणसे फार आवडत व माणसांनाही अगदी तीन-चार वर्षांच्या मुलांपासून तो