पान:Gangajal cropped.pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १८ / गंगाजल


एकाने परमुलुखात जीव दिला. कुटुंबापासून दूर. एकाकी. शेवटी वडिलांना लिहिलेले एक पत्र!...

 “दुसरीने भरल्या घरात एक दिवस जीव दिला. शेवटच्या पत्रातली असहायता व एकाकीपणा हृदयाला पीळ पाडणारा होता. पण सामान्याला कळण्यासारखा नव्हता. आई, भांवडे, नवरा, मुले, संपत्ती, शिक्षण, रूप, मित्रांचा परिवार सर्व होते. मग हा एकाकीपणा का? मागे राहिलेल्यांना निरंतरचे अपराधी करून हे जीव गेले. का? का? का?

 “हा प्रश्न कित्येक वर्षे मी विचारीत आहे. मला आता वाटते की, त्यांच्या गावात देव नव्हता व देऊळही नव्हते. एका क्षणी भरल्या संसारात ही निराधारपणाची जाणीव तीव्र झाली असली पाहिजे"

 क्षणाची फुरसत न देता प्रश्न आला, “अग, पण ज्ञानदेव का गेले? ते तर देवाविना नव्हते ना?

 तितक्याच वेगाने मी उत्तरले, “त्यांचा देव व देऊळ एवढे मोठे झाले होते की, ते लहानशा शरीरात मावेनातसे झाले. शरीराचे बंधन त्यांना अशक्य झाले. शरीरात राहून देवाएवढे मोठे होणे शक्य नव्हते, म्हणून ते गेले.

 दोघींच्या संभाषणाचा दुवा तुटला. प्रत्येकजण आपापल्या विचारात गुरफटलो. माझे मन एक कोडे सोडवीत होते.

 संभाषणाच्या भरात का होईना, बाळ, लहानी आणि ज्ञानदेव अशी सर्वस्वी निराळी माणसे एकत्र गोवली गेली होती. सर्वांनी पंचविशीच्या आत जीव दिला होता, एवढेच का साम्य त्यांच्यात होते? त्या साम्यापाठीमागे जाणिवेचा तीव्रपणा व जाणीव झाल्याबरोबर त्याप्रमाणे कृती करण्याची उतावीळ, हेही होते ना? तिघांनीही धावत जाऊन मृत्यू कवटाळला होता.

 ...आणि आम्ही इतर? आमच्या गावात देव आहे का, ह्याचा विचार आम्ही कधी केला आहे का? रिते आहोत का भरलेले आहोत, हा प्रश्न कधी आमच्या मनाला पडला आहे का? जन्मल्यापासून जिवंतपणे वावरत आहोत. हळूहळू विचाराविना वाट चालत आहोत. मृत्यू अगदी ‘उरी आदळे' पर्यंत..

 ""काय होतंय तुला? माझा सुस्कारा ऐकून तिने काळजीने विचारले.

 माझ्या अथांग रितेपणातून उत्तर आले, “काही नाही, अगदीच काही नाही."

१९६८