पान:Gangajal cropped.pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१५६ / गंगाजल


वाटते. महर्षी कर्वे विसाव्या शतकात अस्तित्वात होते; आणि गांधारी फक्त महाभारताच्या रचनेत आहे. हा फरक बाईंच्यासाठी अस्तित्वात नव्हता. बाईंच्यासाठी गांधारी वास्तविक व्यक्तींच्याइतकी सत्य होती. तिच्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी वरवर जरी पतिनिष्ठेच्या मूल्याची प्रतिनिधी असली, तरी खरोखर तो एक प्रकारचा पतीविषयीचा तिरस्कार होता. स्वत:ची जी फसवणूक झाली, तीविषयी गांधारीने उगविलेला तो एक सूड होता, असे बाईंना वाटते. 'गांधारी शंभर पुत्रांच्याऐवजी शंभर दुःखाना प्रसवली आहे'. या वचनाची आठवण त्यांना सासऱ्यांविषयी लिहिताना येते. पण गांधारीविषयी लिहिताना मात्र तिचेही मन पुत्रवात्सल्यामुळे आंधळे व क्रूर झाले होते, असे त्यांना वाटू लागते. जेव्हा सर्व मुले मारिली जातात, तेव्हा गांधारी खरोखरी शांत होते. गांधारीच्या शांततेचा हा उगम तिच्या वृत्तीचा विकासातून होत नाही, तर आशेच्या सर्वनाशातून होतो. बाईंना या आंधळ्या गांधारीला डोळस करणे आवश्यक वाटते. तिच्या डोळ्यांवरची पट्टी शंभर पुत्रांनी घर भरलेले असताना सोडण्याचा आग्रह न धरणारा धृतराष्ट्र त्यांना तेवढाच सूडाने पेटलेला दिसतो. पतीविषयीच्या सूडाने पेटलेली, पण पतिव्रता भासणारी गांधारी आणि तिच्याविषयीच्या तेवढ्याच उत्कट सूडाने पेटलेला धृतराष्ट्र, पण वरवर समजूतदार दिसणारा आंधळा राजा यांची भुतावळ स्वत:च पेटविलेल्या सूडाच्या अग्नीत जर जळून खाक झाली असेल, तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे बाईंना काही नाही. ती गांधारी वार्धक्याच्या पक्व अवस्थेत सगळ्या आशा जळून गेल्यानंतर पतीच्या आज्ञेने डोळस होते; आणि म्हातारपणी पत्नी म्हणून निष्ठेने पतीचा हात हातात घेते व अग्नीकडे चालत जाते. आंधळी गांधारी आंधळ्या सूडाने पेटली, तेव्हाही पतिव्रताच दिसली आणि डोळस गांधारी पतीला घेऊन मरणाकडे वाटचाल करीत गेली, तेव्हाही पतिव्रताच भासली. गांधारीच्या जीवनाचा भयानक अर्थ सांगताना बाई कुठेतरी गांधारीत वर्तमान वाचीत आहेत असे वाटू लागते.

 तसे पाहिले, तर 'आजोबा' ही व्यक्तिरेखा; 'गांधारी' ही म्हटली तर कथा. वाटचाल आणि यात्रा ही प्रवास वर्णने कुठेतरी. याच प्रवास वर्णनांत निरनिराळी मते आणि स्पष्टीकरणे, असा हा सगळा बाईंच्या ललित- निबंधांचा विस्तार आहे. हा ललित-निबंध कधी एकीकडे झुकला म्हणजे वैचारिक होतो, दुसरीकडे झुकला म्हणजे कथेच्या आणि कवितेच्या जवळ