पान:Gangajal cropped.pdf/148

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १५५


जिव्हाळा समाजासाठी राखून ठेवणाऱ्या आपल्या एकमार्गी सासऱ्यांचा रुक्ष संसार आणि रुक्ष व्यवहार बाईंनी मोठ्या जिव्हाळ्याने सांगितलेला आहे.

 व्रतांच्या निमित्ताने आपण नेमके काय करीत आहो, याचे या नायकांनाही कधी भान नसते. महात्मा गांधी हे भारतीय जीवनातील असेच एक नायक होते. दारिद्याचे आणि साधेपणाचे व्रत त्यांनी घेतलेले होते. ते तिसऱ्या वर्गाने प्रवास करीत; त्यांना त्रास होऊ नये, म्हणून सारा डबा राखीव करणे भाग असे. महात्मा गांधींना साधे जीवन जगता यावे, यासाठी जो खर्च होई, त्याचे प्रमाण वैभवशाली जीवन जगण्यासाठी लागणार्‍या खर्चाहून अधिक होते म्हणून सरोजिनी नायडूंनी एकदा असे म्हटले की, “दरिद्री नारायण को दारिद्य का भोग चढाया जाता है। उसका खर्चा कहीं अधिक है।" गांधींच्या या साधेपणाची आणि महर्षी कर्वे यांच्या अपरिग्रहाची तुलना करून पाहण्याजोगी आहे. महर्षी कर्वे वर्गणी गोळा करण्यासाठी ठिकठिकाणी हिंडले, त्यासाठी जर कुणी तिकीट काढून दिले, तर त्याला कर्व्यांची ना नसे.त्या प्रवासात मोटारीतून हिंडविले, तर त्याला त्यांची ना नसे. वृद्धापकाळी स्वत:च्या खर्चासाठी म्हणून ते काही पैसे देत. तितक्यातच त्यांचा खर्च भागतो की नाही हे पाहण्याची त्यांना जरुरी नाही. पण ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्यांची मात्र त्यांनी चटकन परतफेड केली. कर्वे यांचे अपरिग्रहाचे व्रत हे असेच तात्पुरते असे. सर्वच महनीय व्यक्तीच्या जीवनाचा एक थर असा असतो. ज्या दऱ्या माणसांना जाणवतात, त्या मुंग्यांना जाणवतच नाहीत, ज्या मुंग्यांना जाणवतात, त्या माणसांना जाणवत नाहीत. हा जो माणूस आणि मुंग्या यांच्या आकलनातला फरक, त्यापेक्षा वेगळा प्रकार माणूस आणि अतिमानव यांच्यात नसतो.

 महर्षी कर्वे यांचे बाईंनी जे अलौकिक व्यक्तिचित्र रेखाटलेले आहे, ते व्यक्तिचित्र नाही. ते त्या जीवनावरचे सहृदय, पण तितकेच सत्यनिष्ठ असे भाष्यही आहे. समाजाच्या कल्याणासाठी सर्वस्व वाहिलेल्या कोणत्याही थोर पुरुषाच्या घरगुती जीवनाची जी धूळधाण असते, ती कर्व्यांच्यासारख्या माणसाच्या खाजगी जीवनाची असते. हा माणूस एकदा सर्वांचा झाला म्हणजे बायका-मुलांचा उरतच नाही. हीरोचे सत्य स्वरूप नेहमीच 'अँटी-हीरो' असे असते. नायकाच्या जीवनाचा एक झाकलेला थर 'अ-नायकी' असतो: पुष्कळदा निर्नायकी असतो.

 या व्यक्तिरेखेइतकीच अप्रतिम अशी दुसरी व्यक्तिरेखा मला गांधारीची