पान:Gangajal cropped.pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १५३

 बाईंनी 'युगान्त' हे पुस्तक फार नंतर लिहिले; पण महाभारतावर ठिकठिकाणी भाष्य करण्याची त्यांची प्रथा आरंभापासून आहे. महाभारताच्या जोडीला कधी रामायण तर कधी भागवत असते. पण ते नेहमीचे सहकारी म्हणून नाही; ते ग्रंथ मधूनमधून येतात. मध्येच त्यांना आठवते की, आश्रमात वाढलेल्या अनाथ महत्वाकांक्षी शकुंतलेने 'दुष्यन्त कोण?' हे जाणून त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि हस्तिनापूरच्या गादीची स्वामिनी होण्याचा धाडसी डाव टाकला. हे सांगत असताना महाभारतातील शाकुंतलावर एक नवीन भाष्य निर्माण होण्याची शक्यता दिसू लागते. अशी विविध भाष्ये बाईंच्या ललित-निबंधांत आलेली आहेत. जे सामान्यत्वे कुणा पुरुषाच्या लक्षात येणार नाही, अशा महाभारतातील जागा इरावतींच्या नारी-मनाला सहज स्पर्श करून जातात आणि मग त्यांना असे वाटते की, अंबिका आणि अंबालिका यांच्याशी व्यासांचा नियोगसंबंध झालाच नाही. भीष्माच्या संमतीने एका कोळ्याच्या पोरीने आपल्या सुनांच्यावर उगविलेला हा सूड आहे. राजवाड्यातील या कन्यकांवर अत्याचार झालेला आहे. कुठे कुंतीचा विचार करिताना कुंतीच्या शहाणपणात त्यांना तत्कालीन समाजाच्या वेडगळ श्रद्धेची बीजे आढळू लागतात.

 माद्रीला जेव्हा दोन मुले होतात, तेव्हा कुंतीला असे वाटते, की माद्रीने आपल्याला फसविले. तिने दोघांना आवाहन केले, म्हणून तिला जुळे झाले. जुळे मूल होण्याचा संबंध दोन पुरुषांशी रत होण्याशी आहे, ही तत्कालीन वेडगळ श्रद्धा आणि त्या श्रद्धेला सर्वमान्य सत्य समजून त्यावर आपला सावधपणा उभारणारी कुंती यांचा विचार करतानाच एकदम इरावतीबाई सीतेपर्यंत जाऊन पोहोचतात. सीतेलाही जुळे झाले होते. त्या वेळेच्या समजुतीनुसार यामुळे सीतेचा व्यभिचारीपणा सिद्ध झाला, त्या सीतेला धरित्रीच्या पोटात कायमचे लुप्त होण्याशिवाय दुसरा मार्ग होता तरी कोणता? याच कुंतीविषयी पुन्हा एकदा इरावतींनी विचार केला, आणि खरोखरच कुंतीची संतती नियोगाची समजावी काय, हाही विचार त्यांच्या मनात आला. 'राजधानीच्या बाहेर, वडीलधाऱ्या मंडळींना न विचारिता जे पडले, त्या साऱ्याला नियोगच म्हणावयाचे काय?' असा एक प्रश्न बाईंच्या मनात केव्हातरी तरळून गेला आहे.

 पण या भाष्यांच्या बरोबर मधूनमधून जैन वाङ्मयातील माहितीचा