पान:Gangajal cropped.pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१५२ / गंगाजल

भागवू शकेल काय?', 'माणूस वास्तविक जीवनातील दुःखे स्वप्नात विसरू शकेल काय?', 'माणुसकीची मूल्ये एका पिढीत धुळीला मिळतात, ती पुन्हा उभी करिता येतील काय?', 'स्त्रीराज्य जरी झाले, तरी ते पुरुषांच्या अखंड चिंतनात रमलेले असते; अशी ही स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकेल काय?', 'स्वाभिमान आणि सुखे यांत स्वाभिमान संभाळण्यासाठी दुःखांना निमंत्रण देणारी माणसे मठ्ठ म्हणता येतील काय?', 'म्हातार्‍यांना जगवीत बसणे चांगले, की प्रत्येकाने वेळेवर मरणे चांगले?', 'सुप्त इच्छा दाबता येतील काय?'- हे आणि असे अनेक प्रश्न त्यांचे मन उपस्थित करिते, आणि या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करिते. हळूहळू कुतूहलाची जागा गांभीर्य आणि वेदना घेतात; आणि क्रमाने बाईंचे लिखाण जास्तच अंतर्मुख होऊ लागते. आणि मग त्या अधिक मूलभूत प्रश्न उपस्थित करू लागतात. या प्रश्नांची उत्तरे त्यांची त्यांनाही सापडण्याचा संभव नसतो. असा एक मनाचा प्रवासही सतत चालू आहे. आणि या मनाच्या प्रवासात समाजशास्त्र आणि मानसशास्त्र मधूनमधून त्यांना जास्तच घोटाळ्यात टाकण्याचा प्रयल करितात.

 या अशा अखंड प्रवासात अखंड सहचर म्हणून बाईंच्या जवळ महाभारत आहे. कधी त्या महाभारताच्या व्यक्तींत आपले जीवन पाहण्याचा प्रयत्न करितात; कधी जुन्या मूल्यांच्या आधारे महाभारतातील व्यक्तीच्या वागणुकीचे समर्थन त्या करू लागतात; कधी नव्या मूल्यांच्या आधारे महाभारतातील व्यक्तींवर त्या दोषारोप करू लागतात; त्यांच्यासाठी महाभारत हे अन्वायार्थ लावण्याचे म्हणून केवळ शिल्लक असणारे इतिहासाचे साधनसाहित्य नाही; किंवा महाभारत हे वंदनीय अशा संस्कृतीने निर्माण केलेले एक पुराणकथेचे मूर्त रूपही नव्हे. महाभारतातील व्यक्ती या जणू त्यांच्या भोवताली सतत वावरत आहेत. बाई जशा आपल्या मुलाबाळांना, सासू-सासऱ्यांना, पतीला, आई-वडिलांना विसरू शकत नाहीत, तसे त्यांच्या भोवती महाभारत आहे. गांधारी किंवा कुंती ही त्यांच्यासाठी जणू शेजारिणीसारखी पात्रे आहेत. त्यांची भलावणी केल्याशिवाय किंवा त्यांच्याविषयी तक्रार केल्याशिवाय बाईंना राहवतच नाही. त्या दिल्लीवरून पाठणकोटला जरी जात असल्या, तरी त्याच रस्त्याने सौंदर्यवती गोरीपान दमयंती, हीन-दीन अशी भटकत-भटकत आपल्या मावशीच्या घरी गेली, हे त्यांना चटकन आठवते.