पान:Gangajal cropped.pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



गंगाजल / १५१

भोगातूनच माणसाची माणुसकी शिल्लक राहते. ही विविध दु:खांची अपरिहार्यता स्वीकारीत स्वीकारीत इरावतींचे मन सामाजिक दु:खांकडे आणि विकृतींकडेसुद्धा एक अपरिहार्य व्यथा म्हणूनच पहावयाला शिकले आहे. निदान सामाजिक दु:खांतून माणसाची सुटका करिता येईल, असाही विश्वास त्यांना वाटत नाही; मात्र दु:खाच्या या चौरस जाणिवेने त्यांच्या श्रद्धा ढासळलेल्या नाहीत; मन खचलेले नाही; भट्टीत तापविल्यामुळे सोने अधिकच उजळ व्हावे. त्याप्रमाणे वेदनेच्या भट्टीत दर क्षणी जळताना इरावतींचे मन अधिक उदार आणि सुसंस्कृत झाले आहे.

 वेदनेचा स्पर्श नसणारे एक अप्रौढ बालमन घेऊन सगळ्याच घटनांकडे कुतूहलाने पाहत, त्यांचे कौतुक करीत इरावर्तीचा प्रवास सुरू होतो. हा प्रवास शरीराचा आहे, तसा मनाचाही आहे. संशोधनाच्या निमित्ताने चांदागोंदियांच्या जंगलांपासून गुजरात-राजस्थानच्या वाळवंटांपर्यंत, हिमालयाच्या पायथ्याशी असणाच्या डोंगरांपासून बिहारच्या मैदानापर्यंत अणि आसामच्या जंगलांपासून कुर्गपर्यंत हा शरीराचा अखंड प्रवास चालू आहे. या प्रवासात संकेतांची बंधने आरंभापासूनच गळून पडलेली होती. युरोपच्या वातावरणात ज्यांची लग्ने झाली त्या मुलींना सासरच्या अनेक अनोळखी व्यक्तींचे मुके घ्यावे लागतात. असे अपरिचितांचे मुके घेणे चांगले, की भारतीय नववधूला अनेक अपरिचितांना नमस्कार करावा लागतो तसे नमस्कार करणे चांगले, येथपासून दर ठिकाणी थांबत त्या विचार करीत जातात. हा विचार करताना कधी जंगलांच्या, तर कधी वाळवंटांच्या, कधी सतत चालणाच्या नादांच्या, तर कधी न भंगणाऱ्या शांततेच्या अशा अनेक आठवणी त्यांच्या मनात जाग्या होत राहतात. त्या निसर्गाला संवेदनक्षम मनाने शब्दबद्ध करीत, भोवतालच्या समाजाचे समाज म्हणून चित्रण करीत, प्रवासात आढळणाच्या व्यक्तींची एक जिवंत माणूस म्हणून ओळख करून घेत, सुखाचे आणि दु:खाचे नानाविध प्रकार पाहत हा शरीराचा अखंड प्रवास चालू आहे. या प्रवासात निरनिराळ्या व्यक्ती भेटतात. समाज दिसतात, निसर्गाची विविध चित्रे येतात; पण हा प्रवासाचा एक भाग झाला.

 ह्याबरोबर त्यांच्या मनाचा प्रवास चालू आहे. दर ठिकाणी थांबून त्या स्वत:च्याच मनाला 'हे असे का?' हा प्रश्न विचारीत असतात. स्त्रियांना आधारासाठी जो बळकट पुरुष लागतो, ती गरज शिक्षणाने मृदू झालेला पुरुष