पान:Gangajal cropped.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १५

आळीतील घरे किती उंच, म्हणजे किती मजली असावीत, हेही सांगितले आहे. गावाच्या मध्यभागी असलेले सर्वात मोठे देऊळ ही गावातील सर्वात उंच इमारत असावी, असे सांगितलेले आहे.

  "देवळाखालोखाल देवळाच्या शिखरापेक्षा कमी उंचीचा राजवाडा असावा व राजवाड्यापेक्षा कमी उंचीची घरे ब्राह्मणांची असावीत, असा नियम घातलेला आहे. ब्राह्मण आपल्याला कितीही मोठे समजत असले, तरी विष्णूचा प्रतिनिधी जो राजा, त्याचा मान केव्हाही मोठाच होता. आणि प्रतिनिधीपेक्षा प्रत्यक्ष देवाचा मान सर्वात मोठा होता. लांबूनही येणाच्या प्रवाशाला देवळाचे शिखर दिसले की गाव आले, असे समजावे. देवळाचे शिखर ही गावाच्या अस्तित्वाची, वैभवाची व अभिमानाची एक खूण होती. आपल्याकडे महाराष्ट्रात डोंगरावरची देवळे सोडली, तर गावातील सपाट भुईवर बांधलेली देवळे इतकी भव्य नाहीत. पण दक्षिणेत मात्र अजूनही अशी उंच आणि अतिभव्य देवळे दिसतात. मदुरेच्या मीनाक्षीसुंदरमच्या देवळाची उंचउंच गोपुरे पाचदहा मैलांच्या परिसरात कोठूनही दिसतात. ख्रिस्ती लोकांची देवळेही त्याच पद्धतीने बांधलेली. वरील पुस्तकात दिल्याप्रमाणे देव व देऊळ ह्यांचा स्थलनिश्चितीसाठी उपयोग होई. आपल्या पुण्यातही पूर्वी देवळांचा उपयोग तसा होई. भांग्या मारुती, पासोड्या विठोबा तर होतेच, पण वेश्यांच्या वस्तीत एक छिनाल मारुतीसुद्धा होता."

 "एवढ्याचसाठी का देवळे होती?" माझ्या व्याख्यानावर औपरोधिक प्रश्न आला. "देऊळ असले म्हणजे आपल्या घराची खूण व पत्ता नीट देता येईल असेच ना तुझे म्हणणे?"

 "नाही; देऊळ हे एक श्रद्धास्थान आहे. आशा-आकांक्षांचे प्रतीक आहे. ज्या गांवात ते नसेल ते एक श्रद्धा नसलेले, कोठच्याही तर्‍हेच्या सामुदायिक आकांक्षा नसलेले ठिकाण असते. म्हणून तेथे राहू नये, असे भाष्य हा म्हणीवर करावे लागेल."

 "देऊळ म्हटले, म्हणजे तुझ्या मनात आहे तरी काय? जे नाहीच, त्याच्यासाठी उभारलेली इमारत म्हणजे देऊळ ना? कसले ग प्रतीक होते ते?"

 "एक प्रकारे तू म्हणतेस ते खरेच. देवळामध्ये अरूपाला रूप दिलेले असते. अनादीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते; प्रसंगी अनंताचे विसर्जनही करितात. आपण जे नाही; पण ज्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव आहे असे काहीतरी सत म्हणून आहे. आपल्या आर्ततेत त्या सतला आपण निरनिराळे