पान:Gangajal cropped.pdf/139

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४६ / गंगाजल


खुंट्यांना बांधून ठेविलेले एक प्रकारचे सत्य, स्थल-कालाला न बांधलेले पण सार्वत्रिक असणारे दुसऱ्या प्रकारचे सत्य, कल्पनेत, भावविश्वात, सांस्कृतिक मूल्यांत असणारे तिसऱ्या प्रकारचे सत्य, आणि ललित वाङमयात कलात्मक पातळीवर जाणारे आणखी चौथ्या प्रकारचे सत्य-अशी सत्यांची वर्णव्यवस्था इरावतींनी कधी मानिली नाही. ती त्यांना कुणी समजावून सांगितली असती, तरी पटलीही नसती. त्यांच्यात असणारा समाजशास्त्रज्ञ त्यांना पुन:पुन्हा बजावून सांगत होता की, 'ही स्त्री बाळंत झाली, ती स्त्री बाळंत झाली, अशी शेकडो स्थल-कालविशिष्ट सत्ये एका सार्वत्रिक सत्याच्या पोटात असतात आणि हे सार्वत्रिक सत्यच विविध पातळ्यांवर वावरत असते. विशिष्टातून ते सामान्याचा बोध करून देते. संशोधनातली सगळी अनुमाने या जातीची असतात. हेच सामान्याच्या संदर्भात विशिष्टाचा अर्थ लावते. सगळी मानवी आकलनशक्ती या जातीची असते. आणि ज्याला आपण संस्कृती म्हणतो, तीही इतकी खरी असते, इतकी चिवट असते की, प्रकृतीला तिच्यामुळे जुळते घ्यावे लागते; आणि सगळेच कलेत यावयाचे असते. जर माझ्या ललित-निबंधात 'मी' असेन, तर जेथे मी आहे, तिथे माझे मन, माझी नाती-गोती, माझे सोयरसंबंध आपोआप येणारच. जर माझ्या लालित्याला माझाच अडथळा होणार असेल, तर मग ती कला खरीही नाही, आणि ती मग माझीही नाही.'

 इरावतींच्या संशोधक मनाने ललितवाङमयाच्या प्रकृतीचा अभ्यास न करिता अजाणताच एक वाङमयीन सत्य हेरलेले होते. त्या सत्याचे स्वरूप असे आहे की, ललितवाङमयात सगळीच नावे एकाच वेळी खरी आणि खोटी असतात. त्या नावांच्या पाठीमागे उभी असणारी व्यक्तिमत्त्वे जितकी विशिष्ट असतात, तितकीच सार्वत्रिक असतात. किंबहुना, अनुभव जितके व्यक्तिविशिष्ट होतात, तितके ते जास्त सार्वत्रिक होतात. अनुभवांचा जिवंतपणा असला, म्हणजे स्थलकालांनी बांधलेले सत्य स्थलकालाचा अडथळा न होता आपोआप सार्वत्रिक होते. लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रांच्या- प्रमाणे. आणि जर हा अनुभवांचा जिवंतपणा नसला. तर मग सार्वत्रिक सत्य असो, की वैयक्तिक सत्य असो, भाषा-शैलींचे खांब कलेचा तंबू उभा ठेवू शकत नाहीत. सारेच भुईसपाट होते. कारण ते मुळातच सपाट असते.

 वैचारिक आणि ललित यांच्या सीमेवर वावरणाऱ्या इरावतींच्या एकूण जीवनविषयक दृष्टिकोणातच एक सूक्ष्म अशी विसंगती आहे. ही विसंगती