पान:Gangajal cropped.pdf/135

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४२ / गंगाजल

 विविध संस्कृती आणि विविध तत्त्वज्ञाने यांचा व्यासंग करावा लागला. मानववंशशास्त्रात त्यांना रस असल्यामुळे देशोदेशीच्या सहस्त्रावधी वर्षे प्राचीन असणा-या, उत्खननातून बाहेर पडलेल्या संस्कृती, जगभर पसरलेले वन्य समाज, त्यांच्या चालीरीतींची विविधता आणि भारतीय संस्कृतीचा काही प्रमाणात बदललेला आणि काही प्रमाणात न बदलता तसाच उरलेला एक सांस्कृतिक आणि सामाजिक असा भव्य पट, या सर्वांच्या निकट परिचयामुळे हिंदू स्त्रीच्या मनात असणाच्या स्वाभाविक ग्रह-आग्रहांपासून आणि सांकेतिकतेपासून त्यांचे मन बरेच अलिप्त झालेले आहे. जीवनाची विविधता सतत न्याहाळीत असल्यामुळे आणि उदारमतवादी वैचारिक भूमिकेत त्यांचे संगोपन झालेले असल्यामुळे त्या जीवनाच्या हिडीस आणि कुरूप भागाकडे तटस्थतेने पाहू शकतात. आत्मीय आणि आपल्या असणार्‍या माणसांकडे त्यांनी कितीही जिव्हाळ्याने पाहिले, तरी त्यांच्यातला शास्त्रज्ञ नेहमी सावध, जागा असतो. आणि वासनांच्या चित्रणाचा त्यांनी जरी धसका घेतला नसला, तरी त्यांखेरीज असणाच्या जाणिवा त्यांना महत्त्वाच्या वाटतात. उपाशी माणूस अन्नाकडे जसे पाहतो, तसे वासनांचे विकृत आकर्षण त्यांच्याजवळ मुळीच नाही. एका तृप्त आणि व्यासंगी अशा मनाने, तृप्त झाल्यामुळे विरागी झालेल्या मनाने, व्यक्तीच्या आणि समाजाच्या सगळ्या दु:खांचा स्पर्श त्या वाचकांना घडवून देतात, आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाच्या मलमूत्र विसर्जनाकडे पाहील, त्याप्रमाणे जीवनातील अभद्र आणि बीभत्स त्यांनी तटस्थ ममतेने न्याहाळलेले आहे. हा त्यांच्या मनाचा अतिशय गुंतागुंतीचा आणि तितकाच महत्त्वाचा असा दुसरा भाग आहे.

 आणि तरीही बाईंचे मन नवनवे अनुभव घेण्यासाठी, टिपण्यासाठी सदैव उत्सुक असणारे आहे; त्यांच्या मनाची संवेदनक्षमता भोवतालचे प्राणी, पशू पक्षी, निसर्ग, वनस्पती, पाने, फुले या सर्वांशी जवळीक साधणारी आहे. या संवेदनक्षम मनाने सहजगत्या निसर्गाची व भोवतालच्या समाजाची नानाविध चित्रे टिपलेली आहेत. ही चित्रे टिपताना सहवासाने आपले माणूस सुंदर वाटू लागते, तसाही प्रकार पुष्कळ वेळा घडलेला आहे. ज्यांचे बौद्धिक सामर्थ्य सामान्यांच्यापेक्षा थोडेसे अधिक असते, त्यांच्या इंद्रियांना प्रत्येक घटनेचा अर्थ हुडकण्याची एक अपसूक सवय लागलेली असते. या सवयीमुळे इंद्रियसंवेदनांचा जिवंत ताजेपणा अनुभविण्याची