पान:Gangajal cropped.pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १३५


मराठी वाङमय बाईंनी वाचलेले होते, त्या वाङमयाचा सवंग भोळेपणा, त्यातील खोटे स्वप्नरंजन कुठेतरी बाईंच्या मनावर दाट संस्कार करून गेले होते. त्या संस्कारानिशी त्या बोलत असत. आणि तरीही जणू अकृत्रिम आणि मर्मस्पर्शी अशा लालित्याचा गाभा आपल्या हातात सापडला आहे, असे त्या लिहीत असत. जोपर्यंत त्या कोणतीही कृत्रिम बंधने मनावर न लादता मोकळेपणाने लिहीत होत्या, आणि त्यांच्या लेखणीची धार नेहमीच मुलायम आणि त्याच वेळी तीक्ष्ण होती, तोपर्यंत खुर्चीवर बसून आपल्या उंच आणि किनऱ्या आवाजात माझ्याकडे अगर रणजित देसाईंकडे बोट दाखवून त्या ललितवाङमयाविषयी काय बोलत होत्या, याचा फार गंभीरपणे विचार करण्याची मला गरज वाटली नाही.

 १९४५ नंतर केव्हातरी बाईंनी मराठीतून लिहिण्यास आरंभ केला. ज्या वातावरणात त्या लिहीत होत्या, त्या वातावरणात गुजगोष्टी ऊर्फ ललितनिबंध ऊर्फ लघुनिबंध हा वाङमयप्रकार कोमेजून गेलेला होता. जेव्हा त्याचे रंग. टवटवीत होते. तेव्हाही या वाङमयप्रकारातील कृत्रिमपणाची जाणीव त्या वेळच्या काही रसिकांना होत असावी, असे माझे अनुमान आहे. जे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मराठीत ललितनिबंध निर्माण झाला, ते आदर्श खर्‍या अर्थाने ललितवाङमयाचे आदर्श नव्हते. आपली स्फूर्तिस्थाने म्हणून आद्य मराठी लघुनिबंधकारांनी ज्या इंग्रज लेखकांचा आवर्जून उल्लेख केला आहे, त्या मूळ प्रेरकांच्याच लिखाणाविषयी ते खरोखरी ललितवाङमय आहे, की तेथे असलेल्या शोभेचा व सजावटीचा ललितवाङमय म्हणून चुकून स्वीकार झाला आहे, याविषयी माझे मन साशंक आहे.

 नित्याप्रमाणे मराठी ललितनिबंधांच्या बाबतीतसुद्धा त्यांचा जनक कोण? हा प्रश्न अजून विवाद्य राहिलेला आहे. प्रा.ना.सी.फडके यांचे असे मत आहे की, आपण स्वत: या वाङमयाचे जनक आहोत. गार्डिनर, चेस्टरटन आणि लिंड इत्यादिकांचे निबंध वाचताना फडके यांना असे जाणवले की, मराठीत अशा प्रकारचे लिखाण का नसावे? आणि मग त्यांनी जाणीवपूर्वक हा नवा वाङमयप्रकार जन्माला घातला. त्यांनी लिहिलेला 'सुहास्य' हा पहिला ललित निबंध किंवा ही पहिली 'गुजगोष्ट' इ. स. १९२५ सालची आहे. या ठिकाणापासून मराठी ललितनिबंधांना आरंभ झाला, असे फडके यांचे मत आहे. अर्थातच हे मत भाऊसाहेब खांडेकरांना मान्य असणे शक्य नव्हते. खांडेकरांनी आपले निवेदन सादर करिताना असे