पान:Gangajal cropped.pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३४ / गंगाजल


रसडोळस वाचकांचे लक्ष इरावतींच्या लिखाणाकडे खेचले गेले होते. ललितनिबंधाच्या काही नव्या वाटा इरावतींच्या लिखाणातून प्रकट होत आहेत, असे त्या वेळी कुणाला जाणवले की नाही, हे नक्की सांगता येणार नाही. पण या लेखणीची मोहकता मात्र चटकन वाचकांचे मन वेधून बसली. तेव्हापासून आजतागायत अधूनमधून इरावतींनी ललितनिबंधाच्या वर्गात घालता येईल, अशा प्रकारचे लिखाण केले आहे. या अशा ललित लिखाणाचा 'परिपूर्ति' आणि 'भोवरा' यानंतर येणारा हा तिसरा संग्रह आहे.

 एक वाङमयप्रकार म्हणून ललितनिबंध या वाङमयप्रकाराचा विचार इरावतीबाईंनी केला असेल, असे वाटत नाही. उलट, या वाङमयप्रकाराचा जाणीवपूर्वक शोध त्यांनी घेतला नव्हता, याच्याच खाणाखुणा त्याच्या लिखाणात जागजागी आढळतात; आणि झाली गोष्ट एका अर्थी बरीच झाली, असेही वाटते. ललितनिबंध या वाङमयप्रकाराचा विचार इरावतीबाईंनी जर जाणीवपूर्वक केला असता, तर कदाचित आपण ललितलेखक नव्होत, या जाणिवेने त्यांनी लिखाणच केले नसते; किवा जाणीवपूर्वक ललितनिबंध लिहिण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला असता, तर आज त्यांच्या लिखाणात जो जिवंतपणा आणि ठराविक आकृतिबंध फोडून बाहेर पडणारा चैतन्यांचा आविष्कार दिसतो, तसा तो कदाचित दिसलाही नसता. 'आपण जे लिहीत आहो, त्याचे स्वरूप खरोखरच लालित्याचे आहे काय?' असा मन पोखरणारा भुंगा जर वेळोवेळी बाईंच्या मनात गुंजन करू लागला असता, तर त्या चमत्कारिक दडपणामुळे त्यांच्या हातून एक निर्जीव, साचेबंद पण सजविलेले असे एखादे मखर आपल्या हाती आले असते. माझा आणि त्यांचा परिचय त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी झाला. सायंकालीन, मावळती व म्हणून कोवळी झालेली अशी कांती त्यांच्या मनस्वी वागणुकीवर त्या काळी पसरली होती. पण या शेवटच्या काळातसुद्धा वाङमयाचा उल्लेख त्या अधून-मधून थोड्याशा हेटाळणीनेच करीत.

 'तुम्ही कादंबरीकार, तुम्ही कवी, तुम्ही ललितलेखक,' असा आरंभ करून त्या मधूनमधून सुचवीत की, ललितवाङमयाचा पसारा कल्पनेचा आणि खोटा असतो. सत्याच्या जवळ जाण्याची ललित-लेखकांना इच्छा नसते. बाईंच्या या लिखाणाचा प्रतिवाद करून कलात्मक सत्याची महती त्यांना पटवून द्यावी अशी इच्छा मला कधीही झाली नाही. ऐन तारुण्यात जे