पान:Gangajal cropped.pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


१३२ / गंगाजल

विरोध करणाऱ्या माणसांच्याबद्दल बाईंच्या मनात द्वेष किंवा चीड असे.

 अन्याय्य कृत्य करणाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात अपार करुणा होती, हे मला माहीत आहे; ती मला जाणवलेली आहे.

 त्यांना कोणी कितीही दुखावले असले, तरी त्या माणसाला न्याय देताना त्या स्वत:शी तर कठोर होतच; पण आपल्या माणसाच्या विरुद्ध त्या न्यायाच्या बाजूने उभ्या राहत.

 त्यांच्या पहिल्या सूनबाईंशी त्या जे वागल्या ते ज्यांना माहीत आहे, त्यांना मी लिहिते यात अतिशयोक्ती वाटणार नाही.

 डेक्कन कॉलेजमधील प्रकरणात अनेक माणसे त्यांना दोष देताना मी ऐकिले आहे. बाईंना जे अन्यायाचे वाटले, त्याविरुद्ध त्या सर्व शक्तीनिशी झगडल्या, हे जितके खरे, तितकेच त्या ज्यांच्याशी झगडल्या त्यांच्यावर त्यांचा मनापासून राग नव्हता, हेही खरे.

 ज्या हिटलरबद्दल त्यांना अत्यंत घृणा होती, तेही स्वत:चेच एक रूप आहे, हे झालेले सत्याचे दर्शन त्यांनी मनोमनी स्वीकारले होते.

 बाईंची वृत्ती 'मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू ऐसे' अशीच होती. बाईंच्या लेखांसंबंधी हे लिहीत असताना बाईंना कुणी संतीण बनविण्याचा माझा हेतू नाही. पण या मार्गावरील साधकांपैकी त्या एक होत्या.

 स्वत:मधील हिणकस नष्ट करण्याची धडपड करणारा तो एक अत्यंत प्रामाणिक आत्मा होता, की ज्याने स्वत:च स्वत:शी कठोर आत्मपरीक्षण करून स्वत:ला तावून-सुलाखून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे..

 या 'गंगाजला' बद्दल एवढे लिहिण्याचे कारण नव्हते; पण या संग्रहातील हे निबंध बाईंची अनुभूती सांगत असले तरी ही अनुभूती लौकिक किंवा प्रापंचिक नाही. त्यांच्या नित्याच्या व्यवसायातील, शास्त्रातील नाही, तर ती सर्वस्वी आत्मचिंतनात्मक आहे.

 १९५३ सालापासून ७० सालापर्यंत आम्ही एकमेकींच्या फार निकट होतो असे मला जाणवले, म्हणून या निबंधांची मोड सांगण्याचा हा प्रपंच केला.

- सुलोचना देशमुख