पान:Gangajal cropped.pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १३१

लागल्या होत्या. मूत्यूचे आव्हान त्यांनी स्वीकारिले होते. त्याचप्रमाणे त्या जास्त अंतर्मुख बनल्या होत्या.

 सत्याचे दर्शन फार भयंकर असते. ते पहायला मनाला बळ यावे लागते. जोपर्यंत माणूस आपल्या मनाच्या किमयेने सत्याकडे डोळेझाक करितो, तोपर्यंत एका अर्थाने तो सुखी असतो; पण या पेटाऱ्याचे दार उघडून त्यातले सत्य पाहण्याची धडपड सुरू झाली, म्हणजे शेवटाला जाईपर्यंत ते चैन पडू देत नाही. आणि सगळ्यांत कसोटीची अवघड गोष्ट अशी आहे की, सत्याचे ज्ञान झाल्यानंतर त्याचा आविष्कार सहन करण्याचे बळ राहणे हे कार्य महाकठीण.

 या सत्याबद्दल बोलताना इरावतीबाई काही मृत्यूच्या जाणिवेबद्दल बोलत नाहीत, तर स्वत:च्या भावनेबद्दल बोलतात. स्वत:च्या निरपेक्ष प्रेमाचीही त्या अशीच चिरफाड करितात. दुसऱ्याबद्दलचे वाटणारे प्रेम, दुसऱ्याची काळजी म्हणजे स्वत:ला स्वत:बद्दल वाटणाऱ्या काळजीचे, प्रेमाचे, भीतीचेच ते एक स्वरूप आहे. माणसाचे स्वत:वरचे प्रेम हेच काय ते खरे. हा सगळा अटाट आपण करितो, हा पसारा मांडतो तो स्वत:साठी,- स्वत:वरच्या प्रेमानेच मांडलेला असतो. म्हणूनच आपण त्यात इतके गुंतून पडतो; ते का, असे प्रश्नचिन्ह आहे.

 स्वत:च्या मनाची चिरफाड करणे आणि त्याचा आविष्कार सोसण्याएवढी मनाची तयारी करणे या दोन्ही स्थितीत माणसाने सतत आत्मचिंतन तर केले पाहिजेच; पण स्वत:शी अत्यंत कठोर झाले पाहिजे.

 इरावतीबाई स्वत:ला अशा सारख्या भट्टीत घालीत होत्या. स्वत:मधले हिणकस जाळून टाकण्याची धडपड करीत होत्या. आणि त्या धडपडीतून स्वत:ला तावून-सुलाखून घेतानाच त्यांना 'हे सर्व तूच आहेस' याची जाणीव झालेली असावी.

 हिटलरने ज्यूच्या केलेल्या शिरकाणात कर्वे-कुटुंबियांचे अनेक जवळचे स्नेही मारिले गेले. त्यामुळे हिटलरचे नाव काढिले की, त्या सात्त्विक संतापाने उफाळून उठत.

 कुठे अन्याय झालेला दिसला की, प्रथम त्या अन्यायाच्या विरुद्ध प्राणपणाने विरोध केल्यासारखा अन्यायाला विरोध करीत. त्या घटनेला, त्या व्यक्तीला न्याय मिळेपर्यंत विरोधाला तोंड देत. न्याय मिळेपर्यंत त्यांना चैन पडत नसे; परंतु म्हणून असे कोणी समजण्याचे कारण नाही की, त्यांना